कोकणातील साहित्य वर्तुळात खळबळ, ‘कोमसाप’ संस्था बरखास्तीची मागणी

0
136

 

कोकणातील साहित्यीकांचा आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या ‘कोमसाप’ मध्ये सुरु असलेला वाद धर्मादाय आयुक्तांपर्यंत पोहोचला आहे. संस्थेत आर्थिक घोटाळय़ाच्या आरोपासह, नियमभंग, जागा बळकावणे, काही व्यक्तींची मनमानि असे अनेक आक्षेप घेत काही सदस्यांनी थेट संस्था बरखास्तीची मागणी केली आहे. त्यामुळे कोकणातील साहित्य वर्तुळात खळबळ उडाली आहे…

कोकण मराठी साहित्य परिषदेमधील वाद अध्यक्ष महेश केळुस्कर यांच्या राजीनाम्यानंतर थंडावला असे वाटत होते, मात्र  ते आणखीनच वाढल्याचे स्पष्ट होत आहे. कोमसापचे सदस्य गजानन खंडोरी, विलास सरमळकर, नानासाहेब मालुसरे यांनी 5 ऑक्टोबर 2019 रोजी मुंबई धर्मादाय आयुक्तांना पत्र लिहून अनेक गंभीर आरोप केले आहेत. या पत्राची नोंद धर्मादाय आयुक्त कार्यालयाने करून घेतली आहे. जे/10/841/2019 (रत्नागिरी) जावक क्रमांक 5213/2019 हा टॅग लावून 31 डिसेंबरला हे पत्र रवाना झाल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. गेल्या 12 वर्षापासून कोकण मराठी साहित्य परिषदने पदाधिकारी बदलाचे अहवाल सादर केलेले नाहीत. तसेच जुन्या अहवालांना मान्यता घेतलेली नाही. लेखा परीक्षित हिशोब पत्रके धर्मादाय आयुक्तांकडे दरवर्षी सादर केलेली नाहीत. 16-17 व 17-18 ची हिशोब पत्रके वार्षिक सभेत ठेवण्यात आलेली नाहीत. त्यामुळे सभासदांची मंजुरीही मिळालेली नाही, असे अनेक आक्षेप या पत्रात घेण्यात आले आहेत.

मालगुंड येथील केशवसूत स्मारकाची नियमावली अद्याप तयार झालेली नाही. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींकडे महत्त्वाची पदे देण्यामुळे संस्थेचे हित साधणार नाही. मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या पत्राप्रमाणे केशवसूतांच्या जुन्या घरासह एक एकरचा भूखंड बक्षीसपत्राने लिहून दिला असून कोकण मराठी साहित्य परिषद ही संस्था मालगुंड एज्युकेशन सोसायटीची मूळ जागा बळकावण्याचे प्रयत्न करत असल्याचे त्यात म्हटले आहे. 2013 साली कोमसापच्या सर्वसाधारण सभेत मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दिलीप मुरारी तथा नाना मयेकर यांनी हा प्रश्न विश्वस्थ मधुमंगेश कर्णिक यांना विचारला. तेव्हा हा प्रश्न अनुत्तरीत ठेवून ते निघून गेल्याचे आम्ही पाहिले आहे. या जमीन व्यवहाराविषयी संस्थेच्या सभासदांना माहिती नाही असा आक्षेप सदस्यांनी घेतला आहे.

कोमसापचे संस्थापक मधू मंगेश कर्णिकांवरहि आरोप

केशवसूत स्मारकाची कोनशिला, काव्यदालन, काव्य शिल्प, उद्घाटन शिला या ठिकाणी संस्थापक मधू मंगेश कर्णिक यांनी आपले नाव कोरून घेतले आहे. एवढय़ावर समाधान न मानता स्मारकातील सभागृहाला व व्यासपीठाला आपले नाव दिले. वार्षिक सभेत कोणताही ठराव न होता तळमजल्यावरील सभागृहाची विस्तृत जागा मधू मंगेश कर्णिक साहित्य दालनाने व्यापली आहे. शिल्लक जागेत कोकणच्या साहित्यिकांची छायाचित्रे लावून तथाकथित व्यापक दृष्टीकोन दाखवण्याचा दयनीय प्रयत्न केला आहे. हे सभागृह बाहेर गावच्या साहित्यिक सभासदांना वापरण्यासाठी व सभा घेण्यासाठी बांधण्यात आले असताना कर्णिकांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी ते उपयोगात आणले. स्मारकाच्या आराखडय़ात तशी तरतूद नसताना व सर्वसाधारण सभेची मान्यता नसताना हे सर्व करण्यात आले आहे. मूळ आराखडय़ाप्रमाणे रचना करावी असे आदेश धर्मादाय आयुक्तांनी द्यावेत म्हणून विनंती करण्यात आली आहे. 14 जण कार्यकारी मंडळावर घेण्याची तरतूद असताना सध्या 18 जण कार्यरत आहेत. याला धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेण्यात आलेली नाही. प्रा. अशोक ठाकूर यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे. ते नियमबाह्य आहे. नवा अध्यक्ष 14 सदस्यांतून निवडला जावा अशी आग्रही मागणी या सदस्यांनी धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here