कमी दराने काजू बी विक्री नको, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या सूचना कारखानदार, बागायतदार यांची झाली बैठक

0
158

 

शेतकऱयांनी पीक कर्ज घेऊन किंवा मोठी मेहनत घेऊन काजूचे उत्पादन घेतले आहे. त्यात यंदाच्या हवामानामुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे. त्याचप्रमाणे कारखानदारांनीही बँकेत घर, जमीन किंवा अन्य मौल्यवान वस्तू तारण ठेवून कर्ज घेतले आहे. त्यामुळे शेतकरी व कारखानदारांना ‘ना नफा, ना तोटा’ असे धोरण आखून हा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा बँक सकारात्मक आहे. मात्र, काजू बी 120 रुपयांच्या खाली कोणीही विक्री करू नये, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे.

दोडामार्ग दौऱयावर आलेले पालकमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी काजू दरावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी व कारखानदारांची संयुक्त बैठक लावावी, अशा सूचना दोडामार्ग तहसीलदारांना दिल्या होत्या. त्यानुसार शुक्रवारी दुपारी तहसीलदार कार्यालयात बैठक झाली. यावेळी सावंत यांच्यासमवेत तहसीलदार मोरेश्वर हाडके, सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पडते, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश गवस, कृषी अधिकारी अतुल कांबळे, पं. स. सदस्य बाबुराव धुरी, आत्मा कमिटीचे तालुकाध्यक्ष प्रेमानंद देसाई, चंद्रशेखर सावंत, गणपत देसाई, सूर्यकांत गवस, सूचन कोरगावकर आदी उपस्थित होते.

यावेळी सावंत पुढे म्हणाले की, सध्या कोरोना विषाणूमुळे जर कोणी काजू बी 60 ते 70 रुपये एवढाच दर देऊन खरेदी करत असेल तर तो शेतकऱयांची पिळवणूक करत आहे. त्यामुळे काजू खरेदी करणाऱयांनी 120 रुपये दरावरच खरेदी करावा, अशा सूचनाही सावंत यांनी दिल्या. तसेच जर कोणी 120 रुपयांखाली बी खरेदी करून शेतकऱयांची पिळवणूक करत असेल तर योग्य तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱयांचे लक्ष वेधले जाणार आहे, असेही सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

नियमावर बोट नाही

काजू बी हा नाशवंत घटक नाही आहे. त्यामुळे काजू 120 रुपयांखाली शेतकऱयाने विकू नये. काजू पीककर्ज घेतले आहे, अशा सर्व शेतकऱयांनी जिल्हा बँकेत परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्यावर सवलत दिली जाईल आणि सध्याची पैशाची गरज पूर्ण केली जाईल. हे करत असताना नियमावर बोट ठेवले जाणार नाही, अशी हमी सावंत यांनी यावेळी दिली.

लॉकडाऊन संपेपर्यंत वाट पाहावी!

‘कोरोना’च्या धर्तीवर काजूचा दर कमी होणार नाही. सध्या देशासह संपूर्ण राज्यात लॉकडाऊन आहे. राज्यातील बंद असलेली मार्केट खुली होत नाहीत, तोपर्यंत काजू दर निश्चित होणार नाही. असे असले तरीही शेतकऱयांनी लॉकडाऊन संपेपर्यंत काजू बीचा स्टॉक करावा. आर्थिक गरज असलेल्या शेतकऱयांनी सोसायटीमार्फत प्रस्ताव करावेत. अशा शेतकऱयांना चार टक्के दराने रक्कम वाढीव देण्यात येईल, असे सावंत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here