मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोरच आमदार भास्कर जाधवांची नाराजी उघडपणे दिसून आली आहे. गणपतीपुळे विकास आराखडा भूमिपूजन प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जाधव यांची नाराजी स्पष्टपणे दिसून आली.
यावेळी मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले शिवसेना आमदार भास्कर जाधव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आल्यानंतर व्यासपीठावर आले आणि मागील रांगेत बसले. त्यानंतर उदय सामंत यांनी विनंती केल्यानंतर त्यांनी पहिल्या रांगेतील शेवटच्या खुर्चीत बसणे पसंत केले.
त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्कारावेळी खासदार विनायक राऊत यांनी लांब असलेल्या भास्कर जाधव यांना जवळ आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, भास्कर जाधव यांनी राऊत यांचा हात झटकला. व्यासपीठावरील ही नाराजी उपस्थित सर्वांच्या नजरेत आली. त्यामुळे भास्कर जाधव अजूनही नाराज असल्याचे दिसून येत आहे.