आमदार अनिल पाटलांचा यू-टर्न; शरद पवारांसोबतच असल्याचे केले स्पष्ट

0
164

राज्यातील सत्ता स्थापनेच्या घडामोडींमध्ये सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत गेल्याने जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील चांगलेच चर्चेत आले आहेत. अजित पवारांकडे गेलेले आमदार शरद पवारांकडे परतत असल्याचे पाहून अनिल पाटील यांनी देखील कोलांटी उडी घेत शरद पवारांना पाठिंबा दर्शवला आहे.

सद्यस्थितीत अनिल पाटलांच्या भूमिकेची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अमळनेर तालुक्यातील हिंगोणा येथील रहिवासी असलेले अनिल पाटील यांची पूर्वाश्रमीचे भाजप नेते म्हणून ओळख होती. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे खंदे समर्थक म्हणून ते ओळखले जायचे. ग्रामीण भागात असलेला चांगला जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. याच जनसंपर्काच्या बळावर ते अमळनेर तालुक्यातील दहिवद-पातोंडा गटातून दोनवेळा म्हणजेच 2004 ते 2009 आणि 2009 ते 2014 मध्ये जळगाव जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून गेले होते. त्याचप्रमाणे, अमळनेर बाजार समितीचे भाजपचे सभापती म्हणूनही त्यांनी सलग दोन टर्म (8 वर्ष) कामकाज सांभाळले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते विद्यमान संचालक आहेत. यापूर्वीही भाजपकडूनही त्यांनी जिल्हा बँकेचे संचालकपद भूषवले आहे. भाजपत असताना जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जायचे. भाजपचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पद त्यांनी सांभाळले आहे. त्यांच्या पत्नी जयश्री पाटील आता जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत.

अनिल पाटील यांनी भाजपकडून दोनवेळा अमळनेर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवली. मात्र, दोन्हीवेळा त्यांना पराभव पत्करावा लागला होता. 2009 मध्ये अपक्ष उमेदवार साहेबराव पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता. तर 2014 मध्ये अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांनी त्यांना पराभूत केले आहे. अनिल पाटलांचा हा सलग दुसरा पराभव होता. भाजपतील अंतर्गत गटबाजीला कंटाळून अनिल पाटलांनी अडीच वर्षांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश करण्यामागे माजी आमदार साहेबराव पाटील यांची मोलाची भूमिका होती. मात्र, अनिल पाटील राष्ट्रवादीत दाखल होताच साहेबराव पाटील यांनी भाजपत जाणे पसंत केले. 2014 मध्ये शिरीष चौधरी हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्याने अमळनेर नगरपालिकेचे राजकारणही ढवळून निघाले होते. शिरीष चौधरी हे बाहेरील जिल्ह्यातील असल्याने त्यांना शह देण्यासाठी एकाच जिल्ह्याचे नेते म्हणून साहेबराव पाटील आणि अनिल पाटील एकत्र आले. त्यात शहर विकास आघाडीचे नेते म्हणून अनिल पाटलांनी धुरा सांभाळली. नगरपालिकेत शिरीष चौधरींना शह दिल्यानंतर अनिल पाटील 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेच्या आखाड्यात उतरले. त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून भाजपकडून शिरीष चौधरी समोर होते. दोनवेळा पराभूत झाल्याने अनिल पाटलांना यावेळी मतदारांची सहानुभूती होती. शिवाय यावेळी स्थानिक नेतृत्त्वाचा मुद्दा ऐरणीवर असल्याने अनिल पाटलांनी मैदान मारले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते आमदार म्हणून निवडून आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here