सिंधुदुर्ग – पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोवा बनावटीची दारु वाहतुक करणाऱ्या कंटेनरमधून ६० लाखांची दारु जप्त केली, असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक सुनिल धनावडे यांनी दिली आहे.
पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे व अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदशाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैद्य गोवा बनावटीची दारु वाहतूकी विरोधात कारवाईची मोहिम आखण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरुन आज मुंबई- गोवा महामार्गावर पोलिसांनी सापळा लावला होता. गोव्याहून-मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या MH-18AA-8671 या संशयीत कंटेनरची तपासणी केली. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गोवा बनावटीची दारु व बिअर असे एकुण १ हजार ५२ दारुचे बॉक्स मिळाले. संशयीत कंटेनर ओरोस येथील राजधानी हॉटेल समोर सापळा रचून पकडण्यात आला. यामध्ये ६० लाख १३ हजार २०० रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारु व ३० लाख किंमतीचा कंटेनर असा ९० लाख १३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यामध्ये रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून कंटेनर चालक व क्लीनर यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक सुनिल धनावडे यांनी दिली.
या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरिक्षक सचिन शेळके, पोलीस अंमलदार रामचंद्र शेळके, सुधीर सावंत, प्रकाश कदम, एस.एस.खाडये, सत्यजित पाटील, ज्ञानेश्वर कांदळगावकर, कृष्णा केसरकर, अनुप खंडये, अमित तेली, रवि इंगळे, पी.पी. वालावलकर, फकीर काळसेकर, चंद्रकांत पालकर, पी.पी.गावडे, चंद्रहास नार्वेकर यांनी सहभाग घेतला.