आमदार नीतेश राणे व गुरुजी वर्ल्ड कंपनी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जि. प. मार्फत मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या पहिली ते नववीचे सर्व विद्यार्थी व शिक्षकांसाठी अभ्यासपूर्ण Gklass The e-Learning App उपलध करून देण्यात आले आहे. 30 जून 2020 पर्यंत ही सेवा विनामूल्य राहणार आहे. सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण व आरोगय सभापती सौ. सावी लोके यांनी केले आहे.
सध्याच्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ातील सर्व जिल्हा परिषद, सरकारी व खासगी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. गंभीर परिस्थितीमुळे परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. या कालावधीत विद्यार्थी घरी असल्याने शाळा, शिक्षक व विद्यार्थी यांचा संपर्क काहीसा दुरावला आहे. तसेच कोरोनाची आपत्ती संपण्याचा कालावधीही निश्चित नसल्याने पर्यायाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
सध्याच्या ‘होम क्वारंटाईन’च्या अनपेक्षित कालावधीत पालकांनी विद्यार्थ्यांच्या हातात फक्त मोबाईल देऊन हा प्रश्न तात्पुरता सोडवण्यासारखा नसल्याने घरबसल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ‘स्टडी फ्रॉम होम’ ही नाविन्यपूर्ण संधी जिल्हयातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणारी ही पहिली जिल्हा परिषद असल्याचे सौ. लोके यांनी सांगितले.