सिंधुदुर्ग जिल्ह्यात संचार बंदी, जिल्ह्याच्या सीमांवर आरोग्य पथके तैनात

0
323

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत्या प्रमाणात आढळत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जाहीर झालेल्या पंधरा दिवसाच्या संचारबंदीला अनुसरून जिल्ह्यात याची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे . जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत तसेच जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी यांनी जिल्हावासीयांना संचारबंदीची अंमलबजावणी प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्याच्या सर्व सीमांवर आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच रेल्वे स्टेशन वर देखील येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. संचारबंदी ची कडक अंमलबजावणी केली असल्यामुळे जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये फारशी गर्दी मात्र दिसेनाशी झाली आहे.

जिल्ह्याच्या सीमांवर आरोग्य पथके तैनात

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्व सीमांवर आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत . तसेच जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्टेशन वर आरोग्य पथके येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी नेमली आहेत . एसटी विभागाने आपली सेवा मर्यादित प्रमाणात सुरू ठेवली आहे . बाजारपेठांमध्ये भाजीवाले , फळ विक्रेते , किराणा दुकान , बेकरी व्यवसायसुरू ठेवण्यात आलेले आहेत. मात्र बाजारपेठांमध्ये संचारबंदीची अंमलबजावणी सुरू असल्यामुळे ग्राहक अभावानेच दिसत आहे. दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे .

एसटीने ग्रामीण भागातील फेऱ्या केल्या रद्द

जिल्ह्यात संचारबंदी ची कडक अंमलबजावणी केली जात असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये एसटी वाहतुकीला गेले काही दिवस चांगला प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने ग्रामीण भागात सोडल्या जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द केल्या आहेत. तसे बोर्ड देखील एस टी डेपो मध्ये लावण्यात आले आहेत. काही लांब पल्ल्याच्या फेऱ्या वगळल्या तर एसटीने आपली वाहतूक मर्यादित स्वरुपात चालू ठेवली आहे. यामुळे ग्रामीण भागात कोणत्याही कामानिमित्त जायचे झाल्यास किंवा गावातून शहरात यायचे झाल्यास खासगी सेवेवर प्रवाशांना अवलंबून राहावे लागत आहे.

मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांची रेल्वे स्टेशन मध्ये होते तपासणी

मुंबईतून येणार्‍या चाकरमान्यांची तपासणी करण्यासाठी रेल्वे स्टेशन मध्ये आरोग्य विभागाची पथके तैनात करण्यात आले आहेत. ऑक्सि मीटर तपासणी आणि थर्मल स्कॅनिंग करून येणाऱ्या प्रवाशांचा डेटा नोंदविला जात आहे. ज्या प्रवाशांना कोविड सदृश लक्षणे आहेत त्या प्रवाशांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा उपजिल्हा रुग्णालयात कोविडच्या तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. कणकवली रेल्वे स्टेशन मध्ये आरोग्य विभागाच्या पथकाबरोबर पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here