सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तौक्ते चक्रीवादळातील वंचित नुकसानग्रस्तांना दिलासा

0
263

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्यामध्ये सन २०१९ मध्ये आलेल्या महाभयानक तौक्ते, चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागामध्ये तसेच इतर भागात लोकांच्या शेती बागायती तसेच इतर मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी महाराष्ट्र राज्य सरकारने या चक्रीवादळाने बाधित व नुकसानग्रस्त झालेल्या लोकांना मोठी भरीव आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले होते. काही नुकसानग्रस्तांना कोट्यवधी रुपयांची भरीव आर्थिक मदत देण्यात आली होती.

परंतु त्यावेळी काही लोकांना विविध बाबीअंतर्गत मदत मिळणे अजूनही बाकी होते. त्यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला व सावंतवाडी तालुक्यातील रहीवासी या मदतीपासून वंचित होते व गेली तीन वर्ष त्यांना नुकसान ग्रस्त असूनही भरपाई मिळाली नव्हती. त्याअनुषंगाने ३ वर्षा पुर्वी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी वंचित राहीलेल्या नुकसान ग्रस्त लोकांना मदत मिळण्यासाठी एकुण रक्कम ३ कोटी ९५ लाख २२ हजार २४ रुपयेचा प्रस्ताव शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे सादर केला होता. याबाबत या भागाचे आमदार तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याजवळ सदर वंचित नुकसानग्रस्त लाभार्थ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. सदरची मागणी व त्याची गांभीर्यता लक्षात घेता मागणी तात्काळ मंजूर करुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तौक्ते चक्रीवादळातील बाधित वंचित नुकसानग्रस्त रहिवाश्यांसाठी रक्कम ३ कोटी ९५ लाख २२ हजार २४ रुपये एवढे अनुदान मंजूर केले असून या भागातील नुकसानग्रस्त रहिवाश्यांना दिलासा दिला आहे. ही नुकसानभरपाईची रक्कम मिळण्यासाठी जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार २१ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याला अनुदानाची रक्कम प्राप्त झालेली आहे. व लवकरच नुकसान भरपाईची रक्कम सदर वंचित लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here