सिंधुदुर्ग – यंदा कोरोनाच सावट असलं तरी तळ कोकण म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झालंय. यावर्षी गणेशमुर्ती लहान करण्याच्या सरकारच्या आवाहनाला कोकणवासीयांनी प्रतीसाद दिलेला पाहायला मिळतोय. तळकोकणात पारंपारिक पद्धतीने गणपतीची प्रतिष्ठापना केली गेली असून यावर्षी मात्र पुरोहिताशीवाय गणपतीचं पुजन केल गेलं आहे. जिल्ह्यात ६८ हजार १०० ठिकाणी गणेश मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे.
कोरोना महामारीच्या संकटाचे सावट असून गणपतींचे आगमन झाले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३२ ठिकाणी सार्वजनिक तर ६८ हजार ६८ ठिकाणी घरगुती अशा एकूण ६८ हजार १०० ठिकाणी गणेश मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे. कुडाळ येथील सिंधुदुर्गाचा राजा यासह ३२ ठिकाणी सार्वजनिक गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये दोडामार्ग ५, बांदा १, सावंतवाडी ६, वेंगुर्ला ३, कुडाळ ४, मालवण २, आचरा १, देवगड १, कणकवली ५ आणि वैभववाडी ४ असे ३२ सार्वजनिक गणेशोत्सव त्या त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत होत आहेत. घरगुती गणेशोत्सवामध्ये दोडामार्ग मध्ये ४८३४, बांदा २६५०, सावंतवाडी ९९८५, वेंगुर्ला ४९५२, निवती ३२७०, कुडाळ ८६०३, सिंधुदुर्गनगरी २४२९, मालवण ४५०५, आचरा २४२५, देवगड ६७१०, विजयदुर्ग २६५०, कणकवली ९७१० तर वैभववाडी ५३४५ अशी ६८ हजार ६८ कुटुंबे गणरायाचे पूजन केले आहे.
गणेशोत्सवासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात चाकरमानी जिल्ह्यात दाखल होतात. दरवेळी गणेशोत्सवाच्या आदी एक दोन दिवस त्यांचे आगमन होत असे. मात्र यावर्षी उद्भवलेल्या कोरोना महामारीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमानी लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्यात दाखल झाले आहेत तसेच काही चाकरमानी गेल्या १५ दिवसात दाखल झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाचा एक दोन दिवस आधी येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या कमी दिसत असली तरी प्रत्येक घरी आणि वाडी वस्तीत यापूर्वीच चाकरमानी दाखल असल्याने जिल्ह्यात चाकरमान्यांची कमतरता दिसून येत नाही.