सिंधुदुर्गात माकडतापाचा दुसरा बळी 

0
208

 

महाराष्ट्रभर सध्या ‘कोरोना’चे रुग्ण आढळत असल्याने नागरिकांनी मोठी धास्ती घेतली आहे. तर बांदा-दोडामार्गवर गेली पाच वर्षे असलेले माकडतापाचे संकट काही केल्या सुटत नसल्याचे चित्र आहे. मंगळवारी मध्यरात्री डेगवे-मोयझरवाडीतील दिनेश शांताराम देसाई ( 45) यांचा माकडतापाने मृत्यू झाला. देसाई यांच्यावर गेले दीड महिने गोवा-बांबोळी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती उपचारांना हवी तशी साथ देत नव्हती. ऐन  काजू हंगामात माकडतापाचा दुसरा बळी गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

डेगवे-मोयझरवाडी येथील दिनेश देसाई यांचा अहवाल माकडताप पॉझिटिव्ह आला होता. आठ फेब्रुवारीला त्यांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथील अतिदक्षता विभागात गेले दीड महिना त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, प्रकृतीत फारशी सुधारणा होत नव्हती. अखेर मंगळवारी मध्यरात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

तिघेजण होते दाखल, दोघांचा मृत्यू

पंधरा दिवसांपूर्वी पडवे-माजगाव येथील लक्ष्मण शिंदे यांचा माकडतापाने मृत्यू झाला होता. आतापर्यंत माकडताप पॉझिटिव्ह तीन रुग्ण गोवा-बांबोळीत उपचारासाठी दाखल होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तिसरा रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे.

ऐन काजू हंगामात माकडतापाची धास्ती

गेली चार-पाच वर्षे बांदा परिसरात माकडतापाने थैमान घातले आहे. बांदा परिसरातील ग्रामस्थांची वर्षभराची अर्थव्यवस्था काजूवर अवलंबून असते. मात्र, गेली काही वर्षे या भागात माकडतापाचे रुग्ण आढळत असल्याने शेतकऱयांना काजू बागायतीत जण्याची भीती वाटत आहे. तर काही बागायतदार माकडतापाच्या भीतीने काजू पिकावर पाणी सोडत आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here