सिंधुदुर्गात पॅरोलवर सुटलेले दोघे अलगीकरण कक्षात

0
300

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील कारागृहातून कैद्यांना 45 दिवसांसाठी पॅरोलवर घरी सोडण्यात आले आहे. त्यानुसार सावंतवाडी कारागृहातूनही अनेक कैद्यांना सोडण्यात आले. मात्र, या कैद्यांना घरी न सोडता अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे घरी जाण्यासाठी वाहने नसल्याने ते आपल्या घरीही जाऊ शकत नाही. न्यायालयाने घरापर्यंत सोडण्यास सहकार्य करण्याचे निर्देश तुरुंग प्रशासनास केले असतानाही घरी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. सध्या यातील दोघे कैदी बांदा-सटमटवाडी येथील अलगीकरण कक्षात आहेत.

या ठिकाणी आमची गैरसोय होत नाही. मात्र, न्यायालयाने ज्या हेतूने आम्हांला सोडले, तो हेतूच बाजूला होताना दिसत असल्याने या कैद्यांनी नाराजी व्यक्त केली. सोडत असताना न्यायालयाने 45 व्या दिवशी तुम्ही परतत असताना एक जामीन घेऊन येण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या. मात्र, सावंतवाडी कारागृहातून सोडण्यात आलेल्या पुणे येथील दोघांना घरी न जाता कारागृहातून बाहेर पडल्यावर पोलीस प्रशासनाने थेट अलगीकरणासाठी पाठविले आहे.

तपासणी नाका येथे अलगीकरण कक्ष

दोन्ही कैद्यांना न्यायालयाने 28 मार्च रोजी पॅरोलवर सोडून सावंतवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, त्यावेळी संपूर्ण देशभरात संचारबंदी असल्याने त्यांचे पुणे येथे जाणे कठीण असल्याने त्यांना पोलिसांनी सावंतवाडी येथील अलगीकरण कक्षात ठेवले. त्याठिकाणी गर्दी होऊ लागल्याने तेथून त्यांना सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी बांदा सटमटवाडी येथील तपासणी नाक्यावर हलविले. सद्यस्थितीमध्ये ते या ठिकाणी इतर 24 जणांसोबत राहत आहेत. घरी जाण्याबाबत त्यांच्यासमोर प्रश्नचिन्हच आहे.

घरी सोडण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे!

यातील एक कैदी पुणे येथील आहे. पुढील महिन्यात त्याच्या केसची अंतिम सुनावणी होती. मात्र, कोरोनामुळे आपल्याला पॅरोलवर सोडण्यात आले. आपण गेले सात महिने जेलमध्ये असून आम्हाला पोलीस प्रशासनाने घरी पोहोचण्यास सहकार्य करायचे होते. अशा सूचना न्यायालयाने दिल्या होत्या. मात्र, असे असतानाही आम्हाला कोरोना असेल या भीतीने अलगीकरण करण्यात आले आहे, असे एकाने सांगितले. तर दुसरा कैदी आंबोली येथे झालेल्या चोरी प्रकरणातील असून सदरची चोरी 2011 साली झाली होती. त्याची सजा पुढील दोन महिन्यात संपणार होती. याबाबत अखेरची सुनावणी होणार होती. मात्र, कोरोना संकटामुळे त्याला बांदा येथे अलगीकरण करून ठेवण्यात आले आहे.

स्थानिक प्रशासनाकडून चांगली सोय

सध्यस्थितीबबत बोलताना हे कैदी म्हणाले, स्थानिक प्रशासनाकडून आमची चांगली सोय करण्यात येत आहे. विविध संस्था व येथील स्थानिक ग्रामस्थांकडून जेवण, नाश्ताची सुविधा चांगली करण्यात आली आहे. आरोग्याचीही काळजी घेतली जात आहे. मात्र, आम्हांला घरी जायचे वेध असून आम्हाला घरी सोडण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, अशी अपेक्षा या कैद्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here