कोकण – सिंधुदुर्गात पुन्हा कोरोनाची चाहूल लागली आहे. जिल्ह्यात सध्या १७ रुग्ण उपचार घेत आहेत. संभाव्य चौथ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
केंद्र व राज्याच्या आदेशानुसार जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन मॉक ड्रिल घेण्यात आले. यावेळी संभाव्य लाटेसाठी पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड सेंटरची उपलब्धता, औषध उपलब्धता, मनुष्यबळ, ऑक्सिजन साठा, ऑक्सिजन सिलिंडर याचा आढावा घेण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली
कोरोनाच्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय व्ही. सी. घेण्यात आली. यावेळी शासकीय वैद्यकीय रुग्णालयांची कोविड संदर्भात पूर्वतयारी संपूर्णपणे आहे की नाही, याबाबत खातरजमा करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्ह्याचा आतापर्यंत रिकव्हरी रेट ९७.३२ टक्के असून मृत्यू दर २.६ टक्के राहिला आहे. डबलिंग रेट ४४.८ आहे. पॉझिटिव्ह दर ९.०९ एवढा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५८ हजार ३४१ कोरोना रुग्ण मिळाले. यातील ५६ हजार ७८० बरे होऊन घरी परतले. १५४४ रुग्णांचे निधन झाले, तर १७ रुग्ण उपचार घेत आहेत. ६ लाख ५६ हजार ३७४ एवढे नमुने तपासण्यात आले आहेत. यातील आरटीपीसीआर ३ लाख ४९ हजार ३७८ तर अँटीजन टेस्ट ३ लाख ६ हजार ९९६ एवढ्या करण्यात आल्या आहेत. बाधित रुग्णांत ३२ हजार १०२ पुरुष असून त्यातील १ हजार १८ जणांचे निधन झाले. २६ हजार २३९ महिला असून त्यातील ५२६ महिलांचे निधन झाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या ते तिसऱ्या लाटेपर्यंत कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी निर्माण केलेली कोविड सेंटर संभाव्य कोरोना लाटेच्या पार्शभूमीवर सज्ज ठेवली आहेत. एकूण १३ सेंटर असून यात ९१७ बेडची व्यवस्था केली आहे.