सिंधुदुर्ग – जिल्हयात निलेश राणे विरुद्ध विनायक राऊत धुमशान सुरूच आहे. आजही जिल्ह्यात दोन ठिकाणी खासदार विनायक राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा भाजप कार्यकर्त्यांनी जाळला. कणकवली आणि झारप येथे आज पुतळा जाळण्यात आला.
जिल्ह्यात पुतळा दहनाचा सिलसिला सुरूच
जिल्ह्यात पुतळा दहनाचा सिलसिला शिवसेना, भाजपा पक्षांकडून सुरूच आहे. काल सावंतवाडीत भाजप कार्यकर्त्यांनी विनायक राऊत यांचा पुतळा जाळल्यानंतर आज झाराप आणि कणकवलीतही पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी विनायक राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
कुडलमध्ये कार्यकर्त्यांवर होणार अटकेची कारवाई
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयासमोर भाजपा कार्यकर्त्यांनी अचानक हा पुतळा जाळत पोलिसांना चकवा दिला. निलेश राणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देत भाजपा कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. झाराप येथेही आज भाजपा कार्यकर्त्यांनी पुतळा जाळला. दरम्यान कुडाळ मधील कार्यकर्त्यांवर पुतळा जाळल्या प्रकरणी अटकेची कारवाई होणार आहे. या कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत अशी माहिती कुडाळचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली आहे.
कणकवलीत कडक पोलीस बंदोबत असताना जाळला पुतळा
आज सकाळपासूनच कणकवली शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला असतानाच, पोलिसांचे शहरातील बंदोबस्ताचे नेटवर्क भेदून भाजपा कार्यकर्त्यांनी विनायक राऊत यांचा पुतळा जाळला व निषेधाच्या घोषणा दिल्या. या आंदोलनात तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे, सभापती मनोज रावराणे, माजी तालुकाध्यक्ष राजन चिके, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बबलू सावंत, शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेविका मेघा गांगण, उपाध्यक्ष सोनू सावंत, युवा मोर्चाचे संदीप मेस्त्री, सदा चव्हाण, संतोष पुजारे, पिसेकामते सरपंच सुहास राणे, आदी कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते.