सिंधुदुर्गात गोड्या पाण्यातील मत्स्य क्रांतीतुन आत्मनिर्भरतेची चळवळ अतुल काळसेकर यांनी दिली अभियानाची माहिती

0
219

 

सिंधुदुर्ग – कोरोनाच्या काळात अनेक बेरोजगार कोकणात परतले. त्यात येथील अर्थकारणात महत्वाचा वाटा असलेल्या मासेमारी व्यवसायावर दुष्काळाचे सावट दिसत आहे. यातून मार्ग काढताना सिंधुदुर्गात गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायात येथील बेरोजगारांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी सिंधू आत्मनिर्भर अभियानाच्या माध्यमातून चळवळ सुरू करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने सिंधुदुर्गात मत्स्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हे अभियान आणि जिल्ह्याच्या अर्थकारणात होणारी क्रांती यावर सिंधू आत्मनिर्भर अभियानाचे संयोजक अतुल काळसेकर यांनी मांडली भूमिका.

मत्स्य शेतीला सिंधुदुर्गात संधी, परंतु….

सिंधू आत्मनिर्भर अभियानाचे संयोजक अतुल काळसेकर म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीला संधी आहे. परंतु हे मासे खाण्याची फारशी सवय येथील लोकांना नाही. तर त्याच्या डिश येथील हॉटेल व्यावसायिकांना माहीत नाहीत. अशावेळी कोरोनामुळे पुन्हा कोकणात परतलेल्या लोकांना काम द्यावं या उद्देशाने विचार करत असताना केंद्राच्या योजना या तरुणांपर्यंत पोचवाव्यात असे धोरण होते. त्यात गोड्या पाण्यातील शेतीकडे वळताना गोड्या पाण्यातील माशांच्या डिश लोकांना कळाव्यात म्हणून हा आम्ही महोत्सव घेत असल्याचे ते म्हणाले. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आल्यानंतर पहिल्यादा सिंधुदुर्गात 34 तलावातील माशांचे लिलाव झालेले आहेत. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील 10 तलावांमध्ये केज कल्चर मत्स्य पालनाची संधी असल्याचे ते म्हणाले.

कोरोना काळात गावी परतलेल्या बेरोजगारांना संधी

सिंधुदुर्ग हा चक्रमान्यांचा जिल्हा म्हणून परिचित आहे. कोरोना काळात या जिल्ह्यातील मुंबईकर गावी परतले. रोजगार गेलेल्या आणि येथील बेरोजगार असलेल्या लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी सिंधू आत्मनिर्भर अभियानाची सुरवात करण्यात आली असे अतुल काळसेकर यांनी सांगितले. केंद्राच्या योजना लोकांपर्यंत पोचवतानाच प्रत्यक्ष बेरोजगार उद्योगात यावेत असे आपले प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

हळद क्रांतीनंतर आता गोड्या पाण्यातील मत्स्य क्रांती

मागच्या एप्रिल महिन्यात आम्ही येथील शेतकऱ्यांना 25 हजार किलो हळदीच्या बियाण्याच वाटप केल. हा क्रॉप पॅटर्न बदलण्याचा प्रयोग होता. तो यशस्वी झाला आहे. यावर्षी 75 हजार किलोपेक्षा जास्त हळद पावडर तयार होणार आहे. त्याच्या प्रोसेसिंगची व्यवस्था आम्ही केली आहे. गेले सहा महिने आम्ही मत्स्य संपदा योजनेवर काम करतोय. जास्तीतजास्त लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा व्हावा हा उद्देश आहे. केज कल्चर, पोन्ड कल्चर, बायोफ्लॉग असेल, शोभिवंत माशांचा प्रकल्प, बर्फ कारखान्यांची कमतरता आहे. यातले उद्योजक तयार व्हावेत यासाठी प्रयत्न करतोय असे अतुल काळसेकर म्हणाले.

गोड्या पाण्यातील मासे खायची सवय नाही म्हणून…

आमच्या जिल्ह्यातील लोकांना गोड्या पाण्यातील मासे खायची सवय नाही. लोकांची चव बदलावी म्हणून सावंतवाडी मध्ये आम्ही मत्स्य महोत्सव भरवला आहे. या ठिकाणी गोड्या पाण्यातील माशांचे विविध पदार्थ आम्ही लोकांना करून दाखवले आहेत. मत्स्य संपदा योजनेतून आपले प्रकल्प करणाऱ्या लोकांना चांगली संधी मिळावी त्यांचे प्रकल्प चांगले चालवत हा देखील या निमित्ताने आमचा उद्देश आहे असेही ते म्हणाले.

‘बासा’ नाही त्याला ‘चिली फिश’ म्हणा !

या महोत्सवात आम्ही जागतिक पातळीवर खाल्ल्या जाणाऱ्या बासा माशाचे नामकरण चिली फिश अस केलंय. कोकणात बासा शब्दाचा अर्थ शिळा असा घेतला जातो. व्हिएतनाम सारख्या देशाचं अर्थकारण या माशांवर अवलंबून आहे. एकट्या जे. एन. पी. टी. बंदरात 6 कंटेनर बासा रोज व्हिएतनाम इथून मुंबई मार्केटमध्ये येतो. जगातला कोणताही असा देश नाही जिथे हा मासा खाल्ला जात नाही. मात्र महाराष्ट्रात अर्थकारण बदलण्याची ताकद असलेला हा मासा खाल्ला जात नाही. कदाचित बासा म्हणजे शिळा असा अर्थ असल्याने खाल्ला जात नसावा म्हणून आम्ही त्याला चिली फिश अस नाव दिल आता या महोत्सवात गोव्याचे मुख्यमंत्री होते त्यामुळे महाराष्ट्रसोबत गोव्यातही त्याला चिली फिश म्हटलं जाईल. त्यातून तो खाण्याचे प्रमाण वाढेल असा विश्वास काळसेकर यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यात मोठी वॉटर बॉडी उपलब्ध

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी वॉटर बॉडी उपलब्ध आहे. यामध्ये मत्स्य पालन प्रकल्प राबविले तर येथील अर्थकारण बदलू शकत. वादळ, कोरोना याचा समुद्रातील मत्स्य व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यात मच्छिमार अडचणीत आले आहेत. त्यात मत्स्य दुष्काळ आहे. यावर गोड्या पाण्यातील मत्स्य शेती रोजगाराची नवी संधी देईल. खाड्या, नद्या यासोबत 34 तलाव आपल्याकडे आहेत यामध्ये या शेतीला संधी आहे. यावर्षी सांगायला आवडेल की आपल्याकडच्या 34 धरणांमध्ये मत्स्यपालन करण्याकरता लिलाव झाला. ही सर्व धरण लिलावाने आपल्याच जिल्ह्यातील तरुणांनी घेतली आहेत. अशी माहिती अतुल काळसेकर यांनी यावेळी दिली. पुढच्या काळात जिल्ह्यात गोड्या पाण्यातील मत्स्य शेती बहरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here