कोरोनाचे संकट ओढवल्यापासून ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आलेल्या व्यक्तींमधून एकूण 174 व्यक्तींना ‘होम क्वारंटाईन’ मुक्त करण्यात आले आहे. सिंधुदुर्गात कोरोना बाधित असलेला एकही रुग्ण नसला, तरी जिल्हय़ात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरुच असून त्याच अनुषंगाने कोरोना नमुना चाचणीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. 32 नमुने कोरोना चाचणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
कोरोनाचं संकट ओढवल्यानंतर देशात संचारबंदी लागू झाली आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ातही या संचारबंदीची अंमलबजावणी सुरू होऊन जिल्हय़ाच्या सीमा बंद करण्यात आल्या. अशा परिस्थितीत जिल्हय़ाबाहेरून आलेल्या काही लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. अशा व्यक्तींचा 28 दिवसांचा होमक्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींमधून 174 जणांना होम क्वारंटाईन मुक्त करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हय़ात एकमेव कोरोनाबाधित रुग्ण सापडला होता. तोही आता कोरोना मुक्त झाल्यानंतर नव्याने कोरोना बाधित रुग्ण एकही नाही. असे असले तरी, जिल्हय़ाच्या आरोग्य यंत्रणेमार्फत सर्वतोपरी खबरदारीच्या उपाययोजना सुरू ठेवण्यात आल्या आहेत. विशेष करून ज्या लोकांमध्ये कोरोनाची थोडीफार लक्षणे दिसत आहेत, अशा लोकांना आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या 48 व्यक्तींना जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचाराखाली ठेवण्यात आले आहे. तसेच जिल्हय़ाबाहेरून येणाऱया लोकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. सध्या 32 नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
दिवसभरात 1 हजार 583 व्यक्तींची तपासणी
जिल्हय़ातून आजपर्यंत 115 नमुने मिरज येथे तपासणीसाठी पाठविले असून 83 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. अजून 32 नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. 384 व्यक्तींना घरीच विलगीकरण करण्यात आले असून 41 व्यक्ती या संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत. 28 दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 174 आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत मंगळवारी 1 हजार 583 व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली.
2949 मे. टन धान्य वितरण
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत जिल्हय़ामध्ये 2 हजार 949 मे. टन धान्याचे वितरण करण्यात आले आहे. जिल्हय़ातील 418 रास्त भाव धान्य दुकांनांमधून हे वितरण करण्यात आले. तर 432 धान्य दुकानांमधून 3 हजार 469 मे. टन नियमित धान्याचे वाटप करण्यात आले आहे. कुडाळ येथील गोदामातून माहे मे साठीच्या नियमित धान्याची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे मे महिन्यामध्येही नियमित व मोफत असे वाटप सुरळीत राहील.
दहा ठिकाणी शिवभोजन केंद्राची स्थापना
जिल्हय़ात दहा ठिकाणी शिवभोजन केंद्रांची स्थापना करण्यात आली असून या ठिकाणी एकूण 750 थाळी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शिवभोजन केंद्र व उपलब्ध थाळींची संख्या पुढीलप्रमाणे आहे. जिल्हा मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे दोन बचत गटांकडे मिळून 150 थाळय़ा, सावंतवाडी येथील विघ्नेश हॉटेल येथे 100 थाळय़ा, कुडाळ येथे संकल्प स्वयंसहाय्यता समूह 50 थाळय़ा, स्वाधर लोकसंचालित साधन केंद्र 50 थाळय़ा, हिरकणी लोकसंचलित साधन केंद्र, कणकवली 100 थाळय़ा, श्री स्वयंसहाय्यता महिला बचत गट, मालवण 100 थाळय़ा, हॉटेल संडे कॉर्नर ऍण्ड कॅटरर्स, वेंगुर्ले 50 थाळय़ा, गुरू माऊली भोजनालय देवगड 50 थाळय़ा, तनया घरगुती खानावळ, वैभववाडी 50 थाळय़ा, चैतन्य प्रशिक्षण संस्था, दोडामार्ग 50 थाळय़ा या प्रमाणे एकूण 750 थाळय़ा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
कामगारांसाठी नऊ ठिकाणी निवारा केंद्रे
लॉकडाऊनमुळे जिल्हय़ात अडकलेल्या मजूर, कामगार तसेच बेघरांसाठी नऊ कॅम्प उभारण्यात आले असून त्याठिकाणी 187 व्यक्तींच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये आंबोली येथे 18, शेर्ले येथे 21, इन्सुली टोल नाका येथे 24, आंबोली पब्लिक स्कूल येथे 28, पडतेवाडी येथे 29, भगवती मंगल कार्यालय, कणकवली येथे 22, खारेपाटण येथे 21, बोर्डवे येथे 17, वैभववाडी येथे सात या प्रमाणे व्यक्तींनी आसरा घेतला आहे.
घरीच अलगीकरण 0384
संस्थात्मक अलगीकरण 0041
पाठविण्यात आलेले एकूण नमुने 0115
अहवाल प्राप्त झालेले नमुने 0083
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 0001
निगेटिव्ह आलेले नमुने 0082
अलवाल प्राप्त न झालेले नमुने 0032
विलगीकरण कक्षात दाखल 0048
सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण 0000
मंगळवारी तपासणी झालेल्या व्यक्ती 1583