सिंधुदुर्गात कोरोनाचा एकमेव ‘पॉझिटिव्ह’ रुग्णही आता ‘निगेटिव्ह’

0
230

 

सिंधुदुर्ग जिल्हय़ाला तूर्त मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हय़ात एकमेव सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा दुसरा कोरोना चाचणी अहवालही निगेटिव्ह आला आहे. तसेच दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या सिंधुदुर्गातील मालवण व सावंतवाडी येथील दोन्ही रुग्णांचेही कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता जिल्हय़ात एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र नागरिकांनी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. संचारबंदीचे योग्य पालन करावे. सर्वांनी आपापल्या घरातच थांबावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

संपूर्ण देश लॉकडाऊन होण्यापूर्वी सिंधुदुर्गात रेल्वेने आलेला कणकवलीमधील एक प्रवासी कोरोना बाधित आढळला होता. 24 मार्चला कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर त्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात येऊन उपचार सुरू करण्यात आले होते. या रुग्णाची गेल्या 14 दिवसांत प्रकृती सुधारल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णाचा नमुना चाचणीसाठी पाठविण्यात आला होता. हा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा एकदा त्या रुग्णाचा नमुना चाचणी अहवाल पाठविण्यात आल्यावर दुसरा नमुना चाचणी अहवालही निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली. त्यामुळे लवकरच त्याला जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे.

धार्मिक कार्यक्रमात सहभागी त्या दोघांचे रिपोर्टही निगेटिव्ह

दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात झालेल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये जिल्हय़ातील दोन व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. या दोन्ही व्यक्तींना विलगीकरण कक्षामध्ये दाखल करून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. या दोन्ही व्यक्तींच्या नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये सध्या 19 रुग्ण दाखल आहेत. आतापर्यंत 56 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून सर्व नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यापैकी 55 नमुने निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णाचा नमुनाही आता निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत जिल्हय़ातील नमुने तपासणीसाठी एनआयव्ही पुणे येथे पाठविण्यात येत होते. यापुढे हे नमुने व्हीडीआरएल, मिरज येथे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे अहवाल लवकर प्राप्त होतील.

जिल्हय़ात एकूण 366 जणांचे घरीच विलगीकरण करण्यात आले असून 50 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये आहेत. 28 दिवस विलगीकरण केलेल्या व्यक्तींची संख्या 46 इतकी आहे. जिल्हय़ातील ज्या व्यक्तींनी त्यांच्या कामासाठी नवी दिल्लीचा प्रवास केला आहे. त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत 2436 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. जिल्हय़ात ताप व खोकल्याच्या रुग्णांचे सक्रिय सर्वेक्षण सुरू आहे.

बीपी, शुगरच्या रुग्णांसाठी तपासणी सुविधा

जिल्हा रुग्णालयातील 28 क्रमांकाच्या ओपीडीला येणाऱया मधुमेह, उच्च रक्तदाब व ह्रदयरोग असलेल्या व्यक्तींना आता त्यांच्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तपासणी व औषधोपचारांची सुविधा मिळणार आहे. रुग्ण वाहतुकीसाठी तसेच काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आपत्कालीन वैद्यकीय सेवा कार्यक्रमाचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. शंतनू वाईकर  (9405956747) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here