सिंधुदुर्ग – सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या वतीने आज क्रंतिदिनी मोदी सरकारच्या विरोधात जेल भरो आंदोलन छेडण्यात आले.यावेळी चले जाव चा नारा देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.दरम्यान आंदोलनकर्त्यां आशा कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.ओरोस रवळनाथ मंदिर येथे हे आंदोलन करण्यात आले.
देशात मोदी सरकार आल्यापासून शेतकरी, कामगार, श्रमिक विरोधी कायदे आणले जात आहेत. तसेच सर्व क्षेत्रात खाजगीकरण केले जाता आहे. यामुळे देशात बेरोजगारी वाढत आहे. शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यात कोरोना ने आणखी भर पडल्याने शेतकरी श्रमिक मेटाकुटीस आले आहेत. त्यामुळे जनता विरोधी मोदी सरकारच्या विरोधात सर्वत्र नाराजीचे सुरू उमटत आहेत. त्यात सर्व शेतकरी कामगार श्रमिक संघटनांनी देशात मोदी सरकार चले जावं चा नारा देत या संघटनांनी देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स सहभागी असल्याने जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या वतीने आज ९ ऑगस्ट या क्रंतिदिनी मोदी सरकार चले जाव या आंदोलनात सहभाग घेतला होता. संघटनेच्या सर्व आशा कार्यकर्त्या सकाळपासून ओरोस येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे जमत होत्या. बघता बघता याठिकाणी शेकडो आशा भगिनी उपस्थित झाल्या. दुपारी दोन दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत चले जाव चा नारा देत जेल भरो आंदोलन करण्यात आले. यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी शेकडो आशा कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. तसेच यावेळी आपल्या मागण्यांकडे ही शासनाचे लक्ष वेधले !