सिंधुदुर्ग – सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी कोरोना बाधित झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. हा कर्मचारी स्वॅब तपासणीला देण्याचे काम करीत होता. मात्र, त्यालाच लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. दोन दिवस त्याला ताप येत असल्याने त्याचा स्वॅब तपासणीसाठी देण्यात आला होता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उत्तम पाटील यांनी याला दुजोरा दिला आहे. संबंधित रुग्णाला उपचारार्थ ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून त्याची तब्येत स्थिर असल्याचे आरोग्य प्रशासनाने म्हटले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या निकटच्या संपर्कातील सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले असून उद्या त्यांचेही स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत अशी माहितीही डॉक्टर पाटील यांनी दिली.