अल्पवयीन मुलीला घरातून पळवून तिचे अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचून सावंतवाडीतील युवकाला कुडाळ तालुक्यातील एका गावातून अटक केली. नंदकिशोर ऊर्फ नंदू सुरेश खंदारे (22) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला बुधवारी ओरोस येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 22 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी दिली.
संशयित नंदू खंदारे याने मंगळवारी रात्री एका अल्पवयीन शाळकरी मुलीच्या घरात घुसून तिला फूस लावून तिचे अपहरण केले. ही घटना मुलीच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली.
पोलीस अधिकारी स्वाती यादव यांच्यासह पोलीस कर्मचारी शरद लोहकरे, प्रमोद काळसेकर, प्रांजल धुमाळे यांनी शहरासह गोवा, न्हावेली, झाराप येथे शोधमोहीम हाती घेतली. तसेच प्रत्येक चेकपोस्टवर नाकाबंदी केली होती. अखेर त्या युवकाला पहाटे कुडाळ तालुक्यातील एका गावातून ताब्यात घेत अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली. याप्रकरणी खंदारे याच्याविरोधात मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ओरोस न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अधिक तपास स्वाती यादव करत आहेत.