आवडीचे शिक्षण घ्यायचे असेल तर , अंगी केवळ जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असून भागत नाही . शिक्षण घ्यायचे तर आर्थिक परिस्थिती देखील दमदार असावी लागते . परिस्थिती अभावी अनेक हुशार आणि होतकरु मुलांना मनासारखे शिक्षण घेता येत नाही . संगमेश्वर नजीकच्या लोवले येथील शुभम संतोष दोरकडे या विद्यार्थ्याच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आड आली मात्र इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने स्वतःकडे असलेल्या शेत जमिनीत कलिंगडासह विविध उत्पादने घेत कृषी क्षेत्रात पदवीधर होण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्याचे ठरविले आहे . आई वडिल आणि बहिण यांच्या सहकार्याने यावर्षी त्याने कलिंगडाची लागवड केली असून उत्तम पीकही आले आहे .
लोवले संगमेश्वर येथील शुभम संतोष दोरकडे याने बारावी विज्ञान शाखा पूर्ण झाल्यानंतर कृषी पदवीधर होण्याचा चंग बांधला . घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याला बारावी नंतर लगेचच कृषी महाविद्यालयात प्रवेश मिळवणे शक्य झाले नाही . मात्र निराश न होता त्याने कृषी मालाची विक्री करणाऱ्या एका दुकानात नोकरी पत्करली. वर्षभर येथे नोकरी करुन मिळालेला पगार बचत करुन त्याने पुढील वर्षी जिद्दीने सावर्डे ता . चिपळूण येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश मिळवला . राहण्याचा , शिक्षणाचा खर्च करणे हे त्याच्या समोर आव्हानच होते . बॅंकेकडून शैक्षणिक कर्ज मिळवून त्याने यातून मार्ग काढला खरा तरीही स्वतःकडे असणाऱ्या शेतजमीनीत शेतीमालाची विविध उत्पादने घेण्याचा चंग त्याने बांधला .
घरी मदतीचे हात असल्याने वडिल संतोष आई सविता आणि बहीण प्रणिता यांनी शुभमचे कृषी पदवीधर होण्याचे स्वप्न साकारण्याकरिता त्याच्या मेहनती हातांना बळ दिले . शुभमने शिक्षण सांभाळत प्रथम गांडूळ खत तयार केले . घरासमोर असणाऱ्या जागेत यावर्षी सेंद्रीय खताच्या जोरावर त्याने कलिंगड लागवड केली . याबरोबरच विविध प्रकारच्या पालेभाज्या , भेंडी , वालई शेंग , हळद आणि यामध्ये आंतरपिक म्हणून गोंड्याची लागवड केली . शुभमच्या या मेहनतीला चांगलेच फळ आले . घरातील मंडळींच्या पाठबळामुळे शुभम महाविद्यालयात गेल्यानंतर मालाच्या विक्रीसाठी आई वडिल आणि बहिणीची मोठी मदत होत आहे . आपल्या घरासमोरच संगमेश्वर देवरुखरोडवर शुभमने शेत मालाच्या विक्रीचा स्टॉल उभा केला असून त्याच्या शेती उत्पादनांची उत्तम विक्री होवून त्याच्या हाती चांगले पैसे येत आहेत .
याबाबत बोलतांना शुभम दोरकडे म्हणाला की , माझे कृषी पदवीधर होण्याचे स्वप्न आहे . आई वडिल आणि बहीण यांनी माझ्या या स्वप्नाला सत्यात उतरविण्यासाठी मोलाची मदत केली असल्याने आपण आज तृतीय वर्षापर्यंत पोहचलो आहोत . परिस्थितीवर मात करायला शिकलं पाहिजे याचा अनुभव मला यातून मिळाला . परिस्थिती नाही म्हणून रडत न राहता कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर आपल्याला काहीही अशक्य नाही याची अनुभूती मला यातून आल्याचे शुभमने सांगितले .