वाडा गावातील 10 जण आयसोलेशनमध्ये

0
258

 

देवगड तालुक्यातील वाडा येथे 51 वर्षीय महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर संपर्कात आलेल्या 10 जणांना जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन विभागात दाखल करण्यात आले. वाडा गावातील 14 वाडय़ांसह तीन कि. मी. परिसरातील पुरळ व नाडण गावातील प्रत्येकी तीन वाडय़ांचा परिसर कंटेनमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आला आहे, अशी माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. संतोष केंडके यांनी दिली.

वाडा येथील वाशी येथे आंबा वाहतूक करणाऱया व्यक्तीच्या आईचा अहवाल सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आला. तर आंबा वाहतूक करणारा व त्याची पत्नी यांचा अहवाल रविवारी निगेटिव्ह आला होता. पॉझिटिव्ह आलेली महिला ही मुंबईमधून आलेली नसून तीचा मुलगा मुंबई-वाशीहून आल्याने त्याच्या संसर्गामुळे तीला कोरोनाची लागण झाली. आईचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मुलाचा व सूनेचे स्वॅब पुन्हा घेऊन पाठविण्यात येणार आहेत. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने सोमवारी रात्री 12 वा. वाडा गावातील महिलेल्या संपर्कातील सहा जणांना रात्रीच देवगड येथे संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले. मंगळवारी सकाळी त्यांना जिल्हा रुग्णालयात नेऊन त्यांचे स्वॅब घेऊन त्यांना आयसोलेशन विभागात दाखल करण्यात आले.

मंगळवारी सकाळी विभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, तहसीलदार मारुती कांबळे, जि. प. आरोग्य सभापती सौ. सावी लोके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष केंडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले, सभापती सुनील पारकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, पं. स. सदस्या सौ. पूर्वा तावडे आदींनी वाडा येथील भागाला भेट देऊन जिल्हाधिकाऱयांच्या सूचनेनुसार कंटेनमेंट झोन संदर्भात नियोजन केले. त्यानुसार सर्वप्रथम बाधीत रुग्णांचा संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये पाच जणांना ओरोस येथे आयसोलेशन विभागात पाठविण्यात आले.

वाडा गावाचा कुटुंब सर्व्हे करण्यात आला असून त्यानुसार 20 वाडय़ांचा कंटेनमेंट झोन करण्यात आला. वाडा गावातील 14 वाडय़ा त्यामध्ये तेलीवाडी-वाणीवाडी, बौद्धवाडी, चर्मकारवाडी, परबवाडी, गुरववाडी, तावडेवाडी, घाडीवाडी, सडेवाडी, सुतारवाडी, कसबेवाडी, मूळबांधवाडी, गावठणवाडी, भटवाडी, गावठणवाडी, नजीकच्या पुरळ गावातील पुरळ तेलीवाडी, आनंदवाडी, पुजारेवाडी, नाडण गावातील कानडेवाडी, बाईतवाडी, बौध्दवाडी हा भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला. गावाच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. 20 वाडय़ांमध्ये प्रत्येकवाडीमध्ये आरोग्य पथक नेमण्यात आले आहे. तसेच गावात चार डॉक्टर तैनात ठेवण्यात आले आहेत.

बुधवारपासून संपर्कातल्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात येणार आहे. बाधीताच्या नजीकच्यांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. कोडके यांनी दिली. तसेच वाडा गावातील सर्व दुकाने किराणा व मेडिकल देखील बंद ठेवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here