लॉकडाऊन शिथिल होताच बाजारपेथा फुलल्या गर्दीने

0
375

 

सिंधुदुर्ग – जिल्हय़ात आठ दिवसांसाठी लागू करण्यात आलेले लॉकडाऊन शिथील होताच गेले दोन दिवस येथील बाजारपेठेत गर्दी उसळत आहे. सर्व नियम पायदळी तुडवत पुन्हा एकदा गर्दी वाढू लागल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने घेतलेली खबरदारी लोक फारसे मनावर घेत नसल्याचे दिसत आहे. दरम्यान जिल्ह्यातील सर्व दुकाने, बाजारपेठा, कार्यालये पूर्ववत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच बाजारपेठा सुरु ठेवण्यास आणखी दोन तास वाढवून देण्यात आले आहेत. बाजारपेठा आता सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत.

जिल्हय़ात जून महिन्याच्या मध्यानंतर कोरोना बाधित रुग्णसंख्या अचानक वाढली होती. कणकवली व कुडाळ तालुक्यात मोठय़ा संख्येने रुग्ण आढळले होते. त्यामुळे कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हय़ात 2 ते 8 जुलै या कालावधीत लॉकडाऊन केले होते. या काळात कोरोनाचा वेग मंदावण्यात यश आले. त्यामुळे लॉकडाऊन न वाढवता ते शिथील करण्यात आले आहे. 9 जुलैपासून जिल्हय़ातील सर्व दुकाने, बाजारपेठा सुरू केल्या जाणार आहेत. सकाळी नऊ ते पाच या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याच्या कालावधीत शासनाने दोन तासांची वाढ केली आहे. त्यामुळे ही दुकाने आता सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. सायंकाळी सात ते सकाळी नऊ या काळात संचारबंदी कायम राहणार आहे. लॉकडाऊन शिथील करण्यात आले असले, तरी पूर्वीप्रमाणेच सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे हे नियम पाळावे लागणार आहेत. जिल्हय़ाच्या सीमा बंदच राहणार असून ई-पास शिवाय कोणालाही बाहेर जाता येणार नाही किंवा जिल्हय़ात येताही येणार नाही. मात्र सोशल डिस्टन्सिंगचा चांगलाच फज्जा सध्या बाजारपेठेत उडालेला दिसतो आहे. कणकवली बाजारपेठेत आज मोठी गर्दी झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here