सिंधुदुर्ग – भरजरी झुलीचा सजलेला मंडप… बँडबाजा आणि वाजप्यांचा थाट… करवल्यांची लगबग आणि पाहुणेमंडळींचे आगतस्वागत… म्हणताम्हणता भटजी बुवांनी शुभमंगल सावधान म्हटले आणि वधू वरांच्या डोकीवर अक्षता पडल्या… खासदार, आमदार यांच्या लवाजम्यासह जेष्ठानी नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले… जेवणाच्या पंगतीही उठल्या… आणि बाहेर तयारी सुरु झाली वरातीची… लग्नाच्या बोहल्यावरून वरातीला सारे बाराती निघतात आणि समोर पाहतात तर वरातीसाठी सजलेली बैलगाडी… राजेशाही थाटात सजवलेल्या या बैलगाडीत नवरा नवरी बसतात, वरात निघते… एसी गाड्यांच्या जमान्यात काहीतरी युनिक पहायला मिळाल्याने बारात्यांची सेल्फीसाठी धांदल उडते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या एका लग्नाच्या वरातीची दुसरी गोष्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.
तळकोकणात लग्न म्हटलं कि गावासाठी एक उत्सवच असतो. लग्नात कशाचीही कमी राहू नये याची यजमान पुरेपूर काळजी घेत असतात. मानपानाचा थाट जपला जातो. वधू कडची मंडळी वराकडच्या मंडळींच्या स्वागतात काही कमी पडू नये याची पुरेपूर काळजी घेतात. आणि नवरी उचलून वराच्या गावात आली असेल तर तिच्या आणि तिच्याकडील मंडळींच्या स्वागतात वाराकडची मानस काही कमी पडू देत नाहीत. एखादी गोष्ट वधूकडचे लोक आणायला विसरले असतील किंवा कुणाचा मानपान करणे त्यांच्याकडून राहून गेले तर त्याचा फारसा बाहू केला जात नाही. तर अशावेळी कुणीतरी जेष्ठ माणूस पुढे येतो आणि “पाण्यानु ऱ्हवांदे आता, चालीवर धरा” असं म्हणून प्रसंग निभावून नेतो. यावर्षी कोरोनाची महामारी असल्याने कोकणात लग्नाचा थाट फारसा दिसून येत नाही. मात्र त्यातही देवगड तालुक्यातील लग्नाची चर्चा जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे.
त्याचे काय झाले, देवगडचे शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांचा मोठा मुलगा सिद्धेश याचा विवाह होता. तयारी अत्यंत जंगी होती. गाड्यांच्या लवाजम्यासह सिद्धेश लग्नमंडपात दाखल झाला. लग्न उरकून जेव्हा वरात निघाली ती बैलगाडीतून आणि या बैलगाडीचे सारथ्य केले ते सुटाबुटातील मुलाच्या यजमान वडिलांनी. अर्थात मिलिंद साठम यांनी.
यावेळी सिद्धेशचे वडील मिलिंद साठम म्हणाले आजकाल एसी गाडीतून वरती निघतात. मात्र माझी संकल्पना होती कि माझ्या मुलाची बैलगाडीतून वरात काढावी. त्याप्रमाणे माझे मित्र बंटी शेटये आणि नितीन शेटये यांनी आपल्या मामाची बैलगाडी असल्याचे सांगितले. माझ्या डोळ्यात तेव्हा पाणी आलं आणि मला २५ वर्षापूर्वीचे दिवस आठवले. आपण बैलगाडीतून आपल्या मुलाची वरात काढली तर जिल्ह्यातहि चांगली वातावरण निर्मिती होईल आणि लोकांनाही समजेल बैलगाडीची हौस काय आहे. असे सांगतानाच ते असाही म्हणाले कि मी आता असं ठरवलंय कि आपणच स्वतः बैलगाडी घेऊन लोकांच्या वरती काढायच्या या पुढे असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना नवरदेव सिद्धेश साठम म्हणाला कि माझ्या आजोबांची इच्छा होती कि माझी वरात बैलगाडीतून निघावी म्हणून. त्यात वडिलांनाही आपण काहीतरी वेगळं करायचं अशी आयडिया सुचली. पण आज आजोबांची आठवण म्हणून अशी अनोखी वरात काढली आहे. असे त्याने सांगितले.
दरम्यान या वरातीची खबर जिल्हाभर व्हायरल झाली असून. सिंधुदुर्गात या लग्नाची चर्चा चांगलीच रंगली आहे. काहींनी तर “जुना ताच सोना रे, बाबानू गेले दिस ईसरा नुको” अशी मालवणीत झणझणीत प्रतिक्रियाही ठोकून दिली आहे.