13 मार्चपासून रायगड जिल्ह्यात परदेशातून आलेल्या 88 जणांना जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून देखरेखीखाली ठेवले आहे. तर कोरोना सदृश रुग्ण सापडल्याची बातमी देणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 लोकल न्युज चॅनलवर जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोना विषाणूचे महाराष्ट्रात 36 बाधित रुग्ण आढळले आहेत. रायगड जिल्ह्यात कोरोनाचा एक बाधित रूग्ण आढळला आहे. त्याच्यावर मुंबईतील कस्तुरबा गांधी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन जास्त सतर्क झाले आहेत. जिल्ह्यात 13 मार्चपासून 88 जण परदेशातून दाखल झाले आहेत. परदेशातून आलेल्या या नागरिकांना शासनाच्या निर्देशानुसार देखरेखीखाली ठेवण्यात येत आहे.
88 पैकी 41 जणांना विशेष कक्षात तर 47 जण घरी राहून उपचार घेत आहेत. या 88 जणांच्या रक्ताचे नमुने डॉक्टरांनी घेतले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. 14 दिवस हे नागरिक आरोग्य यंत्रणेच्या निगराणी खाली राहणार आहेत. या 88 जणांना कोरोना लागण झालेली नाही. फक्त खबरादारीच्या दृष्टीने त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा असे, आवाहनही जिल्हाधिकारी चौधरी यांनी केले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व शाळा, एनडी स्टुडिओ, समुद्रकिनारे यांवर नागरिकांना प्रवेश बंदी केली आहे. सार्वजनिक आणि खासगी कार्यक्रम रद्द करण्याचे शासनाचे आदेश जिल्ह्यातही लागू केले आहेत