सिंधुदुर्ग – कुडाळ तालुक्यातील रांगणा तुळसुली गावचे सुपुत्र श्री मधुकर गणपत सावंत यांना सन -२०२१ च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्र शासनाकडून *राष्ट्रपतींचे पोलीस पदक* देऊन गौरविण्यात आले आहे. प्रामाणिक व सचोटीने केलेल्या कामाची पोचपावती त्यांना या माध्यमातून मिळाली आहे.त्यांना देण्यात आलेल्या राष्ट्रपती पोलीस पदकामुळे कुडाळ तालुक्याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव त्यांनी उज्ज्वल केले आहे.
मधुकर सावंत यांचे प्राथमिक शिक्षण नेरूर येथील माणकादेवी शाळा व दहावीपर्यंतचे शिक्षण शिवाजी विद्यालय,हिर्लोक येथे झाले आहे. त्यांनी अत्यंत खडतर परिस्थितीत शिक्षण घेऊन पोलीस खात्यात भरती झाले. प्रामाणिकपणे आपले कर्तव्य ते निभावत आहेत.सध्या ते राज्य गुप्तवार्ता विभाग,मुंबई येथे सहाय्यक आयुक्त ह्या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत प्रामाणिकपणे केलेल्या कार्याची दखल घेऊन केंद्र शासनाकडून त्यांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक बहाल करून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.