कोकणातील तरुण नोकऱ्या नाहीत म्हणून निराश न होता स्वतःकडे असणाऱ्या जागेमध्ये शेती उत्पादने घेण्यावर भर देवू लागला असल्याची उदाहरणे गेल्या काही कालावधीत पाहायला मिळत असून शास्त्रोक्त पध्दतीने शेती केली तर उत्पन्न चांगले मिळते याचे उदाहरण संगमेश्वर नजिकच्या धामणी येथील श्रीमंत बळीराजा गटाने सर्वांसमोर ठेवले आहे . या गटाने लावलेली कलिंगडं यावर्षी थेट दुबईला निर्यात होणार आहेत . धामणीतील युवकांनी शेतीमध्ये केलेल्या या अभिनंदनीय प्रयोगांची पाहणी नुकतीच आमदार शेखर निकम यांनी केली आणि बळीराजा गटाचे अभिनंदन केले . यावेळी कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी देखील उपस्थित होते . संगमेश्वर तालुक्यातून देशाबाहेर कलिंगडं पाठवणारा धामणीतील बळीराजा गट हा पहिलाच मानकरी ठरला आहे .
कृषी क्षेत्रात पदवी प्राप्त केलेल्या ममता शिर्के हिने नोकरी मिळत नाही म्हणून हार न मानता धामणी येथे स्वतःची नर्सरी सुरु केली . आंबा , काजू आणि अन्य झाडांची कलमे स्वतः बांधून ती विकू लागली . या व्यवसायाला उत्सफूर्त प्रतिसाद मिळताच तीने धामणीतील काही युवकांजवळ विविध प्रकारच्या शेती उत्पादनांची लागवड करण्याची संकल्पना मांडली . या युवकांनी श्रीमंत बळीराजा गट स्थापन करुन अध्यक्ष म्हणून युवा व्यावसायिक चंद्रकांत बांबाडे यांची निवड केली . या गटातील ममता शिर्के , उल्हास घाणेकर , वैभव जुवळे , मंगेश बांबाडे , ओंकार करंडे यांनी एकत्र येत गतवर्षी सेंद्रीय गटशेतीला प्रारंभ केला . भाजीपाला , कडधान्याबरोबरच एक एकर क्षेत्रामध्ये कलिंगड लागवड केली . गत वर्षी त्यांनी कलिंगडाचे दहा टन उत्पादन घेतले होते . यातून अपेक्षित फायदा होवू शकतो हे लक्षात आल्यानंतर या गटाने यावर्षी नऊ एकर क्षेत्रावर कलिंगड लागवड केली आहे . यावर्षी कलिंगडाचे उत्पादन ६० टनांपेक्षा अधिक होणार असल्याचा विश्वास चंद्रकांत बांबाडे आणि ममता शिर्के यांनी व्यक्त केला. यावर्षीच्या हंगामातील कलिंगडं थेट दुबईला निर्यात होणार असल्याने हे शेतकरी युवक आनंदीत झाले आहेत .
दुबईला कलिंगडं पाठविण्यासाठी पाटणच्या एबीपी एक्झॉटिकचे बळीराम पवार , अमोल रेड्डी यांनी आवश्यक सहकार्य केले आहे . कलिंगडच्या गिरीश , सरस्वती , अनमोल , ब्लॅकबॉल , विशाला जातीची बियाणे एबीपीने पुरवून विक्रीची हमी घेतली आहे . विशाला जातीची बाहेरुन पिवळा रंग असलेली कलिंगडंही उत्तम तयार झाली आहेत . दुबईला जाणाऱ्या कलिंगडांसह बळीराजा गटाच्या शेतीची पाहणी करण्यासाठी आमदार शेखर निकम , जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्र सुर्वे , कृषी अधिकारी जी . बी . काळे , चिपळूणचे कृषी अधिकारी दौलत चव्हाण , संगमेश्वरचे कृषी अधिकारी सी . टी . बागडे , युयुत्सु आर्ते , सरपंच दक्षता पवार , उपसरपंच कांबळे , दीपक चव्हाण , मच्छिंद्र राठोड , बळीराम पवार , मृणालिनी यादव , प्रशांत परब आदि उपस्थित होते .
आमदार शेखर निकम यांनी बळीराजा गटामधील युवकांचे कौतुक करुन या गटाला विज पुरवठा नाकारणाऱ्या महावितरणच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करुन आपण स्वतः याबाबत लक्ष घालून विज पुरवठा उपलब्ध करुन देवू असे आश्वासन दिले . कृषी विभागाने बळीराजा गटाला पाण्याची कमतरता भासू नये म्हणून तातडीने बंधारा उभारण्याच्या सूचना आमदार निकम यांनी दिल्या . आपण स्वतः शेती केली असल्याने यातील अडचणींची आपल्याला पूर्ण जाण आहे . शासकीय अधिकाऱ्यांनी बळीराजा गटासह अन्य शेतकरी गटांना योग्य ते सहकार्य करावे . कोणत्याही शेतकऱ्याची अन्याय होत असल्याची तक्रार आल्यास आपण गंभीर दखल घेऊ असा इशाराही आमदार निकम यांनी यावेळी दिला . जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्र सुर्वे , सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनीही यावेळी मनोगतं व्यक्त करुन श्रीमंत बळीराजा गटाच्या प्रयत्नांचे कौतूक केले .
चौकट :
ममता शिर्के : ( कृषी पदवीधर )कोकणातील तरुणांनी नोकरी नाही म्हणून निराश न होता स्वतःकडे असणाऱ्या जागेमध्ये रब्बी पिकं आणि फळलागवड करावी असं नेहमीच सांगितले जाते . आपण हा प्रयोग स्वतः पासून करायचे ठरवले आणि त्यात यश मिळाले . सहकाऱ्यांना बरोबर घेऊन श्रीमंत बळीराजा गट स्थापन झाला आणि अध्यक्ष चंद्रकांत बांबाडे यांच्यासह अन्य तरुण सहकाऱ्यांच्या धडपडीतून यावर्षी थेट ९ एकरावर कलिंगड लागवड करुन त्याची निर्यात करण्यात आम्ही यशस्वी झाल्याने आता उत्साह वाढला आहे . शेतीमध्ये विविध प्रयोग करण्यासाठी एक कोटींची योजना राबवून हळद लागवड आणि प्रक्रिया उद्योग तसेच करवंद , जांभूळ आणि अन्य फळांवर प्रक्रिया करणारे उद्योग उभारणार असल्याचे स्पष्ट केले .