रत्नागिरीत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. दुबई येथून आल्यानंतर या रुग्णाला कोरोना संशयित म्हणून मंगळवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर या पन्नास वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी रात्री स्पष्ट झाले आहे. प्रयोगशाळेच्या अहवालाने यावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी सांगितले.
जिल्हा शासकीय रुग्णालयात मंगळवारी दोन कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले होते. एक पंजाबवरून प्रवास करून आला आहे तर दुसरा दुबईहून आला होता. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याच्या थुंकी आणि स्वाबचे (घश्यातील द्राव) नमुने प्रयोग शाळेत पाठवण्यात आले होते. त्यांचा अहवाल बुधवारी रात्री जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला. त्यामध्ये दुबईतून आलेला पन्नास वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, यंत्रणा सतर्क झाली आहे.दरम्यान, रात्री उशीरा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आपात्कालीन बैठकीचे आयोजन केले होते. आवश्यक उपायोजना करून नागरिक सार्वजनिक ठिकाणी येणार नाहीत, यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचे आदेश सर्व यंत्रणाना देण्यात आले आहेत.
#Coronavirus #Health #Konkan #Ratnagiri