अखेर ‘त्या’ 34 युवक-युवतींना सिंधुदुर्गात प्रवेश
सिंधुदुर्गातील कामानिमित्त गोव्यात असणाऱ्या युवक-युवतींना अखेर रविवारी दुपारी सिंधुदुर्गात प्रवेश मिळाला. असे असले तरी त्या 34 ही युवक-युवतींना आपल्या घरी जाता येणार नाही. त्यांची दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली या तालुक्यात इन्स्टिटय़ुशनल क्वारंटाईन (विलगीकरण) कक्षात 14 दिवस राहण्याची सोय करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी याबाबतची प्रक्रिया पार पडली.
याबाबतची माहिती अशी की, शनिवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांच्याकडे कैफियत मांडलेल्या गोव्यातील युवक-युवतींनी ते सिंधुदुर्गात घेऊन येत असताना सिंधुदुर्ग प्रशासनाने आंतरराज्य सीमा पार करण्यासाठी ‘लॉकडाऊन’ची असलेली अट सांगत दोडामार्ग-गोवा येथील तपासणी नाक्यावर प्रवेश रोखला होता. या मुलांना सिंधुदुर्गात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तालुकाप्रमुख धुरी यांच्यासमोर पेच निर्माण झाला. त्यानंतर धुरी यांनी या बाबत पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्याकडे कैफियत मांडली. यानंतर त्यांच्याकडून
प्रशासकीय बाबी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, या सर्व घडामोडी होईपर्यंत गोवा प्रशासनाने 34 युवक- युवतींना आपल्या देखरेखीखाली ठेवले होते.
गोव्यात अडकलेल्या युवक-युवतींना सिंधुदुर्गात प्रवेश मिळावा, यासाठी धुरी यांच्या पाठपुराव्याला अखेर रविवारी दुपारी यश आले. सर्वांना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सिंधुदुर्गच्या हद्दीत प्रवेश मिळाला. यावेळी धुरी यांच्यासह
प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे, दोडामार्ग तहसीलदार मोरेश्वर हाडके, नायब तहसीलदार एन. एन. देसाई आदी उपस्थित होते. 34 ही युवक-युवतींना सुरुवातीला तालुक्यातील एका आश्रमात नेण्यात आले. त्या ठिकाणी त्यांची भोजनाची व्यवस्था प्रशासनाच्यावतीने करण्यात आली. त्या ठिकाणी सर्वांची आरोग्य तपासणी झाली व ‘इन्स्टिटय़ुशनल क्वारंटाईन’ कक्षात सोय करण्याच्या दृष्टीने विभागणी करण्यात आली. यामध्ये दोडामार्ग 15, सावंतवाडी 2, कुडाळ 16, कणकवली एक अशी राहण्याची सोय करण्यात आली. सर्वांना उत्तम पद्धतीने कोणतीही गैरसोय होणार नाही, अशा सोयी-सुविधा देण्यात येणार आहेत. या युवक-युवतींना 14 दिवस या कक्षात राहावे लागेल. त्यानंतर त्यांना घरी सोडण्याबाबतचा विचार करून निर्णय घेण्यात येईल, असे
प्रशासनाच्यावतीने प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले. होम क्वारंटाईन व इन्स्टिटय़ुशनल क्वारंटाईन यामध्ये फरक असून होम क्वारंटाईनमध्ये घरात विलगीकरण करण्यात येते. मात्र, इन्स्टिटय़ुशनल क्वारंटाईनमध्ये प्रशासनाच्यावतीने विलगीकरण करून राहण्याची सुविधा केली जाते.
युवक-युवतींची गोव्यात होणारी गैरसोय दूर व्हावी, या एकमेव उद्देशाने शिवसेनेने 34 युवक-युवतींना सिंधुदुर्गात आणण्याचा निर्णय घेतला होता. याला काही अडथळे आले असले तरी महाराष्ट्रातील सरकारने या सर्वांना सिंधुदुर्गात सामावून घेण्यासाठी सहकार्य केले. यापुढेही ज्या युवक -युवतींची गैरसोय होत आहे, त्यांच्या पाठिशी शिवसेना उभी राहणार असून पालकमंत्री सामंत, खासदार राऊत, आमदार केसरकर, नाईक यांनी सहकार्य करण्याची ग्वाही दिल्याचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत युवासेना उपतालुकाप्रमुख भगवान गवस उपस्थित होते.