मासळीचे दर वाढले, समुद्रातील वादळी स्थितीचे परिणाम

0
322

सिंधुदुर्ग – कर्नाटक, गोवा किनारी भागात वादळ निर्माण झाले असून त्याचे परिणाम कोकण किनारपट्टीवर दिसून येत आहेत. समुद्र खवळलेला असून गेल्या चार दिवसांपासून मासळीही मिळत नाही. त्याचा परिणाम माशांचा दरावर झालेला आहे. नेहमीपेक्षा किलोचे दर 100 पासून 400 रुपयांपर्यंत वधारले आहे. वादळ संपेपर्यंत हे चित्र राहील असा अंदाज मच्छीमारांकडून वर्तविला जात आहे.

कोकण किनारपट्टीवर गेले चार ते पाच दिवस वादळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. पाण्याला करंट असल्याने मच्छीमारांना समुद्रात जाणेच अशक्‍य होत आहे. यामधूनही मार्ग काढत मासेमारीला काही नौका जात आहेत. त्यांना मासळीच मिळत नसल्याने रिकाम्या हाती परतावे लागत आहे. समुद्र खवळलेला असल्याने अनेक मच्छीमारांनी बंदरात नौका उभ्या करून ठेवलेल्या आहेत. समुद्रात गेलेल्यांनी जयगड, मिरकरवाडा, मालवण, देवगड येथील बंदरांचा आसरा घेतला आहे. सध्या मासेच कमी मिळत आहेत. त्याचा परिणाम माशांच्या दरावर झाला आहे. पर्ससिननेट सुरू झाल्यानंतर आठवडाभर माशांचे दर घसरलेले होते. मासे स्वस्त मिळत असल्याने खवय्यांनी ताव मारला. वादळामुळे मासळी खोल समुद्राकडे किंवा रत्नागिरीतुन पुढे सरकली असावी असा अंदाज मच्छीमारांनी व्यक्त केला आहे. मासळी कमी असल्याने बाजारातील बांगड्याचा दर 200 रुपयांवरून 300 ते 350 पर्यंत, टायनी (बारीक ) चिंगूळ 80 वरुन 150 रुपये, पापलेट 600 रुपयांचे 1000 रुपये किलो, गेदर 100 रुपयांवरून 200 रुपये, सरंगा 400 वरून 600 रुपये, सौदाळा 200 चा 400 रुपये किलोने विकला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here