सिंधुदुर्ग – माडखोल धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यात झालेल्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. याबाबत अधीक्षक अभियंता समवेत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी आज येथे माडखोल ग्रामस्थ व पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान जगात कोरोनाचा कहर असताना पाणीवापर संस्थेची निवडणूक प्रक्रिया लावणे चुकीचे आहे, अशी नाराजी व्यक्त करून जाहीर करण्यात आलेली निवडणूक तात्काळ रद्द करण्यात यावी, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
खासदार विनायक राऊत यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत आज माडखोल धरण परिसराला भेट दिली. त्यावेळी माडखोल ग्रामस्थांनी आपली कैफियत मांडत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली.
यावेळी ग्रामस्थांनी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यात झालेले भ्रष्टाचार तसेच निकृष्ट काम त्याबाबत हकीगत खासदार राऊत यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच या धरणाचे काम अद्याप अपूर्ण असताना बिल अदा करण्यात आल्याने सखोल चौकशीची मागणी केली.