महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सोशल मीडियावर बदनामी करणारी व त्यांच्या जीवाला धोका निर्माण करणारी मोहीम चालवली जात आहे. याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करा अशी मागणी कणकवली विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांना पत्र देऊन केली आहे.
दरम्यान जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी तालुका पातळीवर पोलीस ठाण्यात निवेदन देत सोशल मीडियातून आक्षेपार्ह मजकूर देणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
वैभववाडीत भाजपाध्यक्ष नासीर काझी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांच्याकडे निवेदन देऊन संबंधित द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. निवेदन देतेवेळी माजी सभापती अरविंद रावराणे, बाळा हरयाण, नगरसेवक संजय सावंत आदी उपस्थित होते.
वेंगुर्ले भाजपा च्या वतीने वेंगुर्ले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर व शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण उपस्थित होते.
कणकवलीत तालुका भाजपा अध्यक्ष संतोष कानडे व राजन चिके यांनी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन फडणवीस यांच्यावर विखारी टिप्पन्नी करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी केली आहे.
कोरोनोच्या संकटामुळे आज महाराष्ट्रासह देश अडचणीत आला आहे. या संकटाच्या सामना आज सर्वच जण एकत्रितपणे करित आहेत. महाराष्ट्रातही विरोधी पक्ष म्हणून राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. तरीही विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येक कृतीला सामाजिक माध्यमांमध्ये असंसदीय शब्दात टीका केली जात आहे. घाणेरडी, अश्लिल व्यंगचित्रे पोस्ट करण्यात येत आहेत. ही टीका अत्यंत हीन दर्जाची आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत तसेच राज्याच्या राजकारणातील लोकाभिमुख सुसंस्कृत व निश्कलंक नेतृत्व आहे असे सांगतानाच, याचे भान न ठेवता काही भाड्याच्या एजन्सी व काही विकृत मानसिकता असणारे हा गलिच्छ प्रकार करित आहेत, त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात यावी व फेसबुक पोस्ट व कमेन्ट टाकणा-या दीपक बोचे या व इतर समाजकंटकाविरुध्द तात्काळ गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी या सर्व निवेदनातून व आमदार नितेश राणे यांच्या पत्रातून करण्यात आली आहे.