सावंतवाडी तालुक्यातील पडवे-माजगाव येथील लक्ष्मण बाबू शिंदे (65) यांचे माकडतापाने गोवा-बांबोळी येथील रुग्णालयात निधन झाले. सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील माकडतापाचा हा पहिलाच बळी आहे. मात्र, आरोग्य यंत्रणेने याबाबत गुप्तता पाळली आहे. माकडतापाचे सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात सात ते आठ रुग्ण असून त्यापैकी डेगवे येथील एक रुग्ण गेले महिनाभर गोवा-बांबोळी येथे उपचार घेत आहे. त्याचीही प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात 2014 पासून माकडतापाची लागण सुरू झाली आहे. विशेषत: शेतकरी, बागायतदारांना या तापाची लागण झाली आहे. गोचिड चावल्यानंतर हा ताप येतो. आतापर्यंत या तापाने दोन्ही तालुक्यात अनेकजणांचा बळी गेला आहे. बांदा-सटमटवाडी येथे दोन वर्षांपूर्वी या माकडतापाने थैमान घातले. एकाच वाडीतील दहाहून अधिकजण माकडतापाने दगावले. त्यामुळे आरोग्य यंत्रणा हडबडली. माकडतापावर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. गतवर्षी माकडतापाने थोडा दिलासा दिला होता. मात्र, यंदा पुन्हा माकडतापाने डोके वर काढले असून पडवे-माजगाव येथील माकडतापाची लागण झालेले लक्ष्मण शिंदे यांचे गोवा-बांबोळी येथे उपचार सुरू असतांना निधन झाले. शिंदे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, तीन मुली असा परिवार आहे. ते मोलमजुरी करत असत.
डेगवेतील रुग्णही गंभीर
माकडतापाचा यंदाच्या वर्षातील हा पहिलाच बळी आहे. सध्या माकडतापाचे रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. डेगवे येथील एक रुग्ण गेले महिनाभर गोवा-बांबोळी येथे उपचार घेत आहे. त्याचीही प्रकृती गंभीर आहे. शिंदे सावंतवाडीच्या कुटिर रुग्णालयात उपचार घेत होते. त्यानंतर त्यांना गोवा येथे हलविण्यात आले. पुणे येथील राष्ट्रीय विज्ञान संस्थानने केलेल्या निदानात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आणखी तिघांचे नमुने पॉझिटिव्ह आले होते.
रक्ततपासणी अहवालास विलंब
पूर्वी गोवा-मणिपाल येथे रक्तनमुन्यांची तपासणी केली जात होती. परंतु केंद्राने अनुदान बंद केल्याने आता पुणे येथे रक्ताचे नमुने तपासले जातात. त्याला वेळ लागत असल्याने नेमका उपचार होत नाही. त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात रक्तनमुने तपासण्याची मागणी करण्यात आली होती. राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी सिंधुदुर्गात एक मार्चपासून तपासणी करण्याचे आश्वासन दिले होते. आता एका रुग्णाचे निधन झाल्याने ओरोसला रक्तनमुने लवकर तपासले जातील, अशी अपेक्षा आहे.