सिंधुदुर्ग – जिल्ह्यात सध्या गणेशोत्सव सणाची धूम सुरु आहे. येथे ४२ दिवसांपर्यंत बाप्पांचे पूजन केले जाते. या काळात वारकरी भजन कलेसोबत प्रामुख्याने फुगडी हि महिलांची लोककला सादर केली जाते. फुगडीला कोकणच्या लोकसंस्कृतीत मोठे महत्व आहे. सध्या गावागावात फुगडी कला सादर करण्यासाठी महिला भगिनी रात्र जागवत आहेत. विशेष म्हणजे यावेळी महिला भगिनींच्या उखाण्यांचेह सामनेही रंगत आहेत. महिला उत्कर्ष समिती कोकणच्या अध्यक्ष जेष्ठ अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या संकल्पनेतून हि लोककला जपतानाच ग्रामीण महिलांना या माध्यमातून कणकवलीत व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
महिला उत्कर्ष समिती सारख्या संस्था आणि अक्षता कांबळी यांच्यासारख्या उपक्रमशील लोकांमुळे या कलेला उर्जितावस्था प्राप्त झाली आहे; मात्र गणेशोत्सव कालावधीत श्री गणेशासमोर आजच्या मोबाईलच्या युगात ही फुगडी सादर करण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. ही पारंपरिक फुगडी लोककला एक मनोरंजनाचे माध्यम ठरली आहे.