महाराष्ट्रात पुढील आठवड्यात होईल नव्या सरकारचा शपथविधी

0
242

महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुतीला १६२ जागा मिळून स्पष्ट बहुमत मिळाले आहे. दरम्यान दिवाळी नंतर म्हणजे पुढच्या आठवड्यात सत्ता स्थापन केली जाण्याचे संकेत युतीकडून देण्यात आले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली असून पुढच्या आठवड्यात नवे सरकार शपथ घेईल. विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५ , शिवसेनेला ५६ तर महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला एक अशा एकूण १६२ जागा मिळाल्या आहेत. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी संख्याबळ घटल्याने भाजपला बहुमतासाठी शिवसेनेची अधिक गरज पडणार आहे. त्यामुळेच ठरल्याप्रमाणे सत्तेत समान वाटा हवा, असा सूर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लावला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘ठरल्यानुसारच होईल’ असे जाहीर करत भाजप शिवसेनेला दुखावणार नसल्याचे संकेत दिले. नव्याने सत्तावाटपासाठी भाजप सकारात्मक असल्याचे संकेतच फडणवीस व शहा यांनी दिले आहेत. दिवाळी झाली की सरकार स्थापनेचे पाहू, असे फडणवीस यांनीही म्हटले होते. त्यामुळे दिवाळी गोडीगुलाबीत साजरी झाल्यानंतर सत्तावाटपाची अप्रिय रस्सीखेच सुरू होईल, असे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे नेते शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंब्याचे संकेत देत असल्याबाबत भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी म्हणाले की, काँग्रेसला पुन्हा विरोधी पक्षात बसावे लागणार असल्याने ते संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. खुद्द उद्धव ठाकरे यांनी महायुतीचे सरकार येईल, असे निकालानंतर सांगितल्याकडेही भांडारी यांनी लक्ष वेधले. तर जागावाटपात उद्धव ठाकरे यांनी दिलदारपणा दाखवला होता. आता भाजपकडून शिवसेनेचा सन्मान ठेवणारा प्रस्ताव येईल अशी अपेक्षा असल्याचे शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here