सिंधुदुर्ग – आंबोलीतील हिरण्यकेशी नदीपात्रातून गोड्या पाण्यातील माशाच्या नवीन प्रजातीचा शोध लावण्यात यश आले आहे.स्चीस्टुरा हिरण्यकेशी या माशाची नवीन प्रजात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे, शंकर बालसुब्रमण्यम आणि डॉक्टर प्रविणराज जयसिन्हा या संशोधकांनी संशोधनाअंती जगासमोर आणली आहे.
पश्चिम घाटातील आंबोली हे गाव जैवविविधतादृष्ट्या अतिशय संपन्न व संवेदनशील समजल जात. या ठिकाणी नेहमीच विविध क्षेत्रातील संशोधकांकडून संशोधन करण्यात आली आहे. यामध्ये विविध प्रकारचे बेडूक, साप, पक्षी, फुलपाखरे, वनस्पती यांच्या नवनवीन प्रजाती संशोधनाअंती जगाच्या समोर आली आहे. यातल्या काही प्रजाती तर जगाच्या पाठीवर केवळ आंबोलीमध्ये सापडतात, त्यामध्येच आणखी एक म्हणजे या गोड्या पाण्यातील माशाची भर पडली आहे. हिरण्यकेशी कुंडामध्ये सापडल्याने माशाला नदीचेच नाव दिले असून हिरण्यकेशी अर्थात सोनेरी केस असलेला हा मासा सध्यातरी हिरण्यकेशी येथील उगमापाशी असलेल्या कुंडामध्ये आढळून आलेला आहे. अद्याप या माशाची नोंद इतरत्र कुठेही आढळून आलेली नाही. हा मासा हिरण्यकेशी नदी पात्रात सापडल्याने या माशाला या नदीच्याच नावावरून हे स्चीस्टुरा हिरण्यकेशी (Schistura hiranyakeshi) असे नामकरण करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे संशोधकांमध्ये
आंबोलीच्या नावांमध्ये या संशोधनामुळे आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे हेही या संशोधनात सहभागी असल्याने महाराष्ट्रातील विविध संशोधकांकडून आनंद व्यक्त होत आहे. यापूर्वी त्यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगेत पालींच्या दुर्मीळ प्रजाती शोधून काढल्या होत्या. तेजस ठाकरे यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील जीवशास्त्र मासिकांनीही प्रसिद्धी देऊन मान्यता दिली होती. आता हिरण्यकश नदीत शोधलेल्या या नव्या प्रजातीच्या माशाचं नाव ‘हिरण्यकेशी’ असं ठेवण्यात आलं आहे. याचा संस्कृत अर्थ सोनेरी रंगाचे केस असणारा असा आहे. माशाच्या या नवीन प्रजातींना शोधण्यासाठी तेजस यांना अंडर वॉटर फोटोग्राफर शंकर बालसुब्रमण्यम आणि डॉक्टर प्रविणराज जयसिन्हा यांचे सहकार्य मिळालं.
यापूर्वी तेजस ठाकरे यांनी काही खेकड्यांच्या प्रजातींचा शोध लावला आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये हिंडून तेजस यांनी तब्बल 11 दुर्मीळ प्रजातींचा शोध लावला आहे. त्याआधी कला शाखेत दुसऱ्या वर्षाला असताना त्यांनी खेकड्याच्या पाच प्रजाती शोधल्या. खेकड्यांच्या प्रजातीबद्दलचा त्यांचा शोधनिबंध न्यूझीलंडमधील ‘झुटाक्सा’ अंकात प्रसिद्ध झाला. या नियतकालिकात आणि वेबसाईटवर तेजस ठाकरे यांचं दुर्मिळ खेकड्यांबद्दलचं दुसरं संशोधन प्रसिद्ध झालं होतं. विशेष म्हणजे पश्चिम घाटातील सह्याद्री या रांगड्या मराठी नावावरून एका खेकड्याचं ‘सह्याद्रियाना’ असं नाव ठेवण्यात आलं होतं.