सिंधुदुर्ग – पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. यात सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असून या दरवाढीला केंद्र आणि राज्य सरकारची धाेरणे जबाबदार आहेत. त्यामुळे आता जनतेनेच याविरोधात रस्त्यावर उतरावे असे आवाहन मनसे नेते परशुराम उपरकर यांनी आज केले.
तसेच वाढती महागाई, इंधन दरवाढ यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आर्यन खान, वानखेडे प्रकरणाला जास्त महत्व दिले जात असल्याचीही टीका त्यांनी केली.
येथील मनसे कार्यालयात श्री.उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारमधील सत्ताधाऱ्यांनी अच्छे दिन येणाार अशी आश्वासने दिली होती. पण ही आश्वासने खोटी ठरली आहेत.
महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक गणित कोडमडले आहे. त्याला केंद्र व राज्य सरकार जबाबदार आहे.त्यामुळेच आपण निवडणुकीत निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीना जनतेने जाब विचारला पाहिजे.
श्री.उपरकर म्हणाले, केंद्राने गेल्या सात वर्षात नोटबंदी व अन्य केलेल्या उपाययोजना असफल ठरल्या आहेत.त्याचे परिणाम आता सुरु झाले असून सर्वसामान्य जनता होरपली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विदर्भ, मराठवाडा प्रमाणे आत्महत्या ट्रेंड सुरु झाला आहे.
त्याचा विचार जिल्ह्यातील सत्ताधारी लोकांनी केला पाहिजे. जिल्ह्यातील १५०० लोकांचे प्राण कोविड मुळे गेलेत. त्याला सत्ताधारी जबाबदार आहेत. शासनाकडे पैसे नसताना मोठमोठ्या घोषणा करतात.त्यामुळेच शिवसेना व कॉग्रेस लोक आंदोलनाची भाषा करताहेत, असे परशुराम उपरकर म्हणाले.