सिंधुदुर्ग – मराठा आंदोलनाची ‘मुका मोर्चा’ म्हणून ज्यांनी आपल्या वर्तमानपत्रातून खिल्ली उडविली, दुर्दैवाने आज त्यांच्याच हातात राज्याचे नेतृत्व आहे. त्यांच्या असंवेदनशील कृतीमुळे मा सर्वोच्च न्यायालयाकडून या आरक्षणाला स्थगिती मिळाली असल्याची प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज व्यक्त केली. तसेच मराठा समाजाच्या प्रत्येक लढाईत भाजप सहभागी राहणार असल्याची ग्वाही देखील दिली.
श्री.तेली म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार कधीच गंभीर नव्हते. सर्वांना विश्वासात घेऊन या सरकारने उचित कारवाई केली असती तर मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली नसती. सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणाला स्थगिती दिल्याने भाजपा सरकारने या आंदोलनासाठी दिवसरात्र घेतलेल्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. राज्यात संख्येने मोठ्या असलेल्या समस्त मराठा समाजाचा या सरकारने अपेक्षाभंग केलेला आहे.
ते म्हणाले, भाजपा सरकारने मराठा समाजाच्या विराट मोर्चाचा सन्मान राखला आणि आरक्षणाची कारवाई सुरू केली.केवळ विधी मंडळात कायदे करून हे आरक्षण टिकवता आले नसते हे आमच्या सरकारने लक्षात घेतले आणि त्यासाठी मागासवर्ग आयोग गठित केला. आरक्षण लढ्याला कायदेशीर आधार दिला. आरक्षणाचा मुद्दा जेव्हा उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट झाला तेव्हा प्रयत्नांची शर्थ करून त्याठिकाणी आरक्षण टिकवले. मात्र आज सर्वोच्च न्यायालयात या आरक्षणाला मिळालेली स्थगिती ही या सरकारच्या, असंवेदनशील हाताळणी आणि बेपर्वाईचा परिणाम आहे. न्यायालयीन कामकाज या सरकारने कधीच गंभीरतेने घेतले नाही, कागदपत्रांची वेळेत परिपूर्ती झाली नाही तर कधी वकील हजर राहिले नाहीत. गेल्या सात महिन्यांपासून मागासवर्ग आयोग सुद्धा गठित केलेला नाही. या सर्व गोष्टी करण्याबाबत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी सरकारशी पत्रव्यवहार सुद्धा केला होता पण त्याची दखल घ्यावीशी या सरकारला वाटली नाही.
माजी मुख्यमंत्री खासदार नारायणराव राणे यांचे तर मराठा आरक्षण लढ्यातील योगदान संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. तत्कालीन सरकारच्या काळात राणे साहेब आरक्षण समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी या आरक्षणाला गती प्राप्त करून दिली होती. या सरकारने या सर्वांच्या प्रयत्नांवर पाणी फेरलेले आहे.
आता यावर अजून काही बोलणे उचित ठरणार नाही,भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा बांधवांच्या यापुढील प्रत्येक लढ्यात पूर्वीप्रमाणेच पाठीशी राहील, त्यांच्या सोबत राहील या समाजाच्या उन्नतीसाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे असे श्री.तेली म्हणाले.