सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीच्या राजवाडा परिसरामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. भजनासाठी गेलेल्या तरुणांवर काळाने घाला घातलाय.भेडले माड अंगावर पडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.ऐन चतुर्थीच्या काळातच काळाने घाला घातल्याने संपूर्ण गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
राजवाडा परिसरातील भले मोठे भेडले माडाचे झाड थेट अंगावर पडल्यामुळे अंजिवडे येथील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना वीज वाहिन्यांचा स्पर्श झाल्याचा संशय आहे. ही घटना आज रात्री ११ वाजण्याच्या सुमारास राजवाड्याच्या बाजूला असलेल्या परिमल टॉवर समोर घडली. राहुल प्रकाश पंदारे (वय २४) व संभाजी दत्ताराम पंदारे (वय २१) रा. गवळीवाडी अशी या दोघांची नावे आहेत. गोठण परिसरात राहत असणारे दशावतार कलाकार गौरव शिर्के यांच्या सोबत भजनासाठी ते आले होते. तेथून परतत असताना ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,दोघेही मृत युवक गोठण येथे भजनासाठी गेले होते. तेथून दुचाकीने परत येत असताना त्यांच्या अंगावर भेडले माडाचे झाड कोसळले. यात त्या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनांची माहिती समजल्यावर तेथील काही ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेतली.सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांना ही माहिती दिली. त्यांनी तात्काळ पालिका व पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच त्या ठिकाणी पालिकेचा बंब व रुग्णवाहिका दाखल झाली. कटरच्या साह्याने त्या दोघांना बाहेर काढण्यात आले .परंतु अंगावर झाडाचा भाग कोसळल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला होता .त्यानंतर तब्बल दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर झाडाखाली अडकलेला १ मृतदेह बाहेर काढण्यात आला.
सावंतवाडी पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, आरोग्य निरीक्षक वैभव नाटेकर, नंदू गावकर आदींनी त्या ठिकाणी मदत कार्यात सहभाग घेतला. कटरच्या साह्याने झाड कापून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर हे मृतदेह सावंतवाडी कुटीर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. याबाबतची माहिती मिळतात घटनास्थळी व रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी,अमित गोते, सुरज पाटील, आदींनी त्या ठिकाणी धाव घेऊन सहकार्य केले. दरम्यान यावेळी सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली.