सिंधुदुर्ग – नैसर्गिक संकटाचे विपरित परिणाम कमी करण्याच्यादृष्टीने राज्यातील किनारपट्टी जिल्ह्यांनी आवश्यक उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. कोविड काळात उभारलेल्या तात्पुरत्या आणि इतर रुग्णालयातील वीज पुरवठा सुरळित राखणे, ऑक्सीजन टँकची सुरक्षितता तपासणे. ऑक्सीजनचा पुरेसा साठा करून ठेऊन पुराचे पाणी रुग्णालयात शिरू न देणे यादृष्टीने विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन उभारण्यात आलेल्या 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री उदय सामंत, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत आदी उपस्थित होते.
या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन झाले तेंव्हा राज्यात कोविड विषाणुचा प्रादुर्भाव नव्हता. परंतू आजच्या परिस्थितीत या रुग्णालयाच्या पुर्णत्वाचे महत्व विशेषत्वाने जाणवते, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या वर्षीपासून आपल्यासमोर नैसर्गिक संकटांचे एक नवीन आव्हान उभे राहिले आहे. अतिवृष्टी आणि वादळाला राज्य सामोरे गेले. या नैसर्गिक संकटात प्राणहानी होऊच नये आणि मालमत्तेची ही हानी टाळता यावी यासाठी प्रयत्न करणे अगत्याचे झाले आहे. किनारपट्टी जिल्ह्यात हजारो लोकांना कोविड नियमांचे पालन करत सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. ही सगळी परिस्थिती सिंधुदूर्गसह किनारपट्टी जिल्ह्यांनी यशस्वीरित्या हाताळली आणि या आव्हानांचा कुशलतेने सामाना केला. गेल्या दीड वर्षापासून आरोग्य यंत्रणेवर जसा ताण आहे तसाच तो यंत्रांवरही आहे, ही यंत्रे ही चोवीस तास सुरु आहेत. त्यामुळे काही ठिकाणी दुर्देवी घटनाही घडल्या, त्या टाळण्यासाठी विद्युत वायरिंग तपासून घेणे, रुग्णालयांचे फायर ऑडिट करणे गरजेचे आहे. या काळात मोठ्याप्रमाणात झाडं उन्मळून पडतात ती वीज तारांवर पडून वीज पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
आपण कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा सामाना केला. दुसरी लाट अजून ओसरलेली नसतांनाच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे, नवीन विषाणुचा शिरकाव झालेला दिसून येत आहे. आपण आरोग्य सुविधांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ केली आहे, भविष्यात ही ती करू. पण याक्षेत्रातील तज्ज्ञांची उपलब्धता वाढवण्याला मर्यादा आहे. त्यामुळे नागरिकांनी कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचे म्हणजे, मास्क व्यवस्थित लावणे, शारीरिक अंतर राखणे आणि हात धुणे या त्रिसुत्रीचे, कटाक्षाने पालन करावे असे आवाहन ही यावेळी केले.