रत्नागिरी जिल्ह्यातील साखरतर येथील 6 महिन्याच्या बाळाचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. साखरतर येथील कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या नात्यातील हे बाळ आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा हादरली आहे. तर रुग्णांची संख्या 6 वर पोचली आहे.
एक आठवड्यापूर्वी साखरतर येथील 49 वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर तिच्या जावेचाही अहवाल पॉझिटिव्ह आला असून आता या महिलेच्या घरातील 6 महिन्याच्या बाळाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान या बाळाची प्रकृती स्थिर असून बाळ तब्बेतीने ठीक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
रत्नागिरीतून मिरज येथे पाठवण्यात आलेले काही काेराेनाचे अहवाल येणे बाकी आहेत.त्यातील ३५ अहवाल काल रात्राै उशिरा आले. त्यापैकी या छोट्या बाळाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.यातील बाळाची प्रकृती स्थिर असून शासकीय रुग्णालयातील बालरोगतज्ञ त्याची काळजी घेत आहेत.तर अन्य जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सहावर पोहोचली असून यातील एकाला डिस्चार्ज देण्यात आला, तर एकाचा मृत्यू झाला होता.