दगडावर साकारले बाळासाहेबांचे हुबेहूब स्टोन आर्ट जन्मदिनी दिली अनोखी मानवंदना

0
272

सिंधुदुर्ग – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कणकवलीतील चित्रकार सुमन दाभोळकर याने दगडावर बाळासाहेबांचे हुबेहूब स्टोन आर्ट साकारले आहे. दगडाला कोणताही आकार न देता फक्त रंगाच्या माध्यमातून हे अप्रतिम स्टोन आर्ट सुमन याने साकारले असून बाळासाहेबांना जयंतीनिमित्त मानवंदना दिली आहे.

दगडांना जिवंत करणारा कलाकार

लॉकडाऊन झाल्यामुळे मुंबईतून गावी आलेल्या सुमन दाभोळकरने दगडांच्या मूळ आकारात कोणतेही बदल न करता त्यावर रंगांची उधळण करुन व्यक्तीचित्रे, निसर्गचित्रे साकारत दगडांना जिवंत करण्याची किमया साधली आहे. दगडांना जिवंत करणारा कलाकार म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे. सुमन दाभोळकर हे मूळचे सिंधुदुर्गातील कणकवलीमधले. आपल्या हातातील कलेने त्यांनी दगडांना मूर्त रुप दिलं. मुंबईत राहणारे सुमन कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर ते कणकवलीमध्ये आपल्या गावी आले. गावी आल्यानंतर त्यांच्यातील कलाकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे त्यांनी आपल्या आजूबाजूला, गावांतील नदीकाठच्या दगडांना बोलत केलं.

फाईन आर्ट्सचे शिक्षण घेतलेले सुमन हे मूळचे कणकवलीचे

गेल्या दोन वर्षापासून ते ठाण्यातील न्यू हॉरिझॉन स्कॉलर्स स्कूलमध्ये आर्ट टीचर म्हणून काम पाहतात. दगडांवर कलाकृती साकारण्याची कल्पना कशी सुचली, यावर ते म्हणाले, लॉकडाऊमुळे मी बऱ्याच वर्षांनी गावी निवांत राहिलो. आमच्या घरापासून हाकेच्या अंतरावरच नदी आहे. नदीवर गेलो असता विशाल खडक माझ्यातील कलाकाराला खुणावू लागले. त्या विशाल खडकांतून मला निरनिराळे आकार दिसले. मग ते आकार प्रत्यक्षात आणण्यासाठी माझ्यातील कलेची मदत झाली. सुरुवातीला गंमत म्हणून मी दगडांवर काही पोट्रेट तयार केले. त्यात मला आनंद मिळत गेला आणि निरनिराळ्या कलाकृती घडत गेल्या. सुमन यांनी दगडावर आतापर्यंत आईनस्टाईन, सचिन तेंडुलकर, नसिरुद्दीन शहा, महेंद्रसिंह धोनी, सोनू सूद आदींचे पोट्रेट साकारले आहेत. शिवाय मासा, मांजर, कुत्रा, कासव, वडापाव या कलाकृतीही साकारल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here