सिंधुदुर्ग – शेत जमिनीवरून दोघा सख्या भावंडात झालेल्या वादातून लहान भावाने मोठ्या भावावर फावड्याने हल्ला केला. ही घटना आज सकाळी इन्सुली-पागावाडी येथे घडली. यात तुकाराम धोंडू पाटील (३३) हे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संदीप धोंडू पाटील (३०) याच्या विरोधात बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इन्सुली-पागावाडी येथे राहणाऱ्या तुकाराम पाटील हे आपल्या शेतात नांगरणी करत असताना त्यांचा लहान भाऊ त्याठिकाणी आला व आपल्याला ही जमीन पाहिजे, असे सांगून वाद करण्यास सुरुवात केली.
त्यातूनच त्याने तुकाराम पाटील यांच्यावर फावड्याने व दांड्याने वार केला. यात त्यांच्या हाताची करंगळी तुटली असून कपाळावर दांड्याचा वार बसल्याने मोठी दुखापत झाली आहे. दरम्यान त्यांनी दिलेल्या तक्रारी नुसार संदीप पाटील यांच्यावर बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.