सिंधुदुर्ग : पती-पत्नीच्या भांडणातून निर्माण झालेल्या वादात म्हापसा-गोवा येथील एका माथेफिरूने पूर्वनियोजित कट करून आपल्या मित्राच्या सहाय्याने पत्नीचा गळा आवळून तसेच डोक्यात दगडाने प्रहार करून खून केला. विशीता नाईक (वय ३५, रा. म्हापसा- गोवा) असे तिचे नाव आहे. हा प्रकार काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास उघड झाला आहे. याप्रकरणी पतीसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. विनोद मनोहर नाईक (मुळ रा. वास्को-गोवा सध्या रा. म्हापसा) व ऋतुराज श्रावण इंगवले (मुळ रा. चंदगड-कोल्हापूर सध्या रा.म्हापसा-गोवा) अशी त्यांची नावे आहेत. गेले अनेक दिवस पती-पत्नीत वाद होते. त्यातून हा प्रकार घडला असावा, असा संशय उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे अवघ्या आठ तासात पोलिसांना या खुनाचा छडा लावण्यास यश आले आहे.
याबाबत दोडामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाळये येथे एका नाल्यात अनोळखी महिलेचा मृतदेह जखमी अवस्थेत आढळून आला. ही घटना काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास उघड झाली होती. दरम्यान याबाबतची माहिती अज्ञाताने दोडामार्ग पोलिसांनी दिल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी तात्काळ धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेतला व चौकशी सुरू करण्यास सुरुवात केली. यावेळी घटनास्थळी मिळालेल्या काही पुराव्यानुसार त्यांनी पतीसह दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशी केली असता त्या दोघांनी आपण गुन्हा केल्याची कबुली दिली.
दरम्यान याप्रकरणी त्या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पती-पत्नीचे पटत नसल्यामुळे पूर्वनियोजित कट करून पतीने हा प्रकार केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार पोलीस तपास करत आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी उपविभागीय अधिकारी सौ. सोळंके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, संबंधित महिलेचे तिच्या पतीशी पटत नव्हते. त्यामुळे त्यांनी फिरायला जाऊया, असे सांगून दोडामार्ग-पाळये येथे एका कारने आले आणि त्या ठिकाणी जेवण झाल्यानंतर भांडण काढून पतीने तिला मारहाण केली. यात एका कपड्याच्या साह्याने प्रथम तिचा गळा आवळला नंतर तिला फरफटत ओढत नेऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात टाकून तिच्या डोक्यावर दगडाने प्रहार केला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर आणखी काही पुरावे उघड होणार आहेत. हा तपास अवघ्या आठ तासात उघड करण्यास आम्हाला यश आले. याबद्दल दोडामार्ग पोलिसांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.