कोरोना अपडेट – सिंधुदुर्गात 9 जनांविरोधात गुन्हा दाखल, रत्नागिरीत एसटीच्या १७२५ फेऱ्या रद्द तर रायगडमध्ये एकाला हलविले विलगिकरण कक्षात

0
285

 

सिंधुदुर्गात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावून आठवडा बाजार भरविनाऱ्या परुळे येथील 9 व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रत्नागिरीत एसटीच्या १७२५ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर रायगड अलिबागमध्ये निगराणीखाली ठेवण्यात आलेल्या एकाला कोरोना सदृश लक्षणे दिसल्याने विलगिकरण कक्षात हलविले आहे.

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये आठवडा बाजार न भरवण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने परुळे गावामध्ये शुक्रवार दिनांक 20 मार्च 2020 रोजी भरणारा आठवडी बाजार बंद राहणार असल्याचे दिनांक 18 मार्च 2020 रोजी गावातील नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आले होते. तरीही हा बाजार भरविण्यात आल्याने येथील 9 व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परुळे ग्रामसेवकांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली होती.

रत्नागिरी जिल्ह्यातील एसटीच्या १७२५ फेऱ्या रद्द.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील एसटीच्या १७२५ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या बस डेपोमधून रोज ४५०० बस धावतात. एसटीच्या जवळपास ३५ टक्के फेऱ्या पूर्णपणे रद्द केल्या आहेत. मुंबई आणि पुण्याच्या एसटी बसे सेवेचा यात समावेश आहे. दहावींच्या मुलांसाठी लागणाऱ्या एसटी बस आज मात्र रद्दतून वगळल्या गेल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाय योजना आणि प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे एसटी प्रशासनाने एसटीच्या बस सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पाश्वभूमीवर एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसमध्ये चढतानाच हातावर सॅनिटायझर देण्यात येत आहे.

निगराणीखाली ठेवलेल्या अलिबागमधील एकाला हलवले विलगीकरण कक्षात

लंडन येथून परतलेल्या एका व्यक्तीला अलिबाग येथील जिल्हा सरकारी रग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. 18 मार्चला त्या व्यक्तीला सुरुवातीला सारंग विश्रामगृहातील निगरानी कक्षात ठेवण्यात आले होते. त्यानंतर ताप आणि सर्दीचा त्रास जाणवू लागल्याने 19 मार्चला विलीगीकरण कक्षात दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. प्रमोद गवई यांनी दिली. रायगड जिल्ह्यातही 327 जण परदेशातून दाखल झाले आहेत. या सगळ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून, जिल्हा प्रशासनाकडून त्यांना जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या निगरानी कक्षात ठेवण्यात येते आहे.

सिंधुदुर्गच्या सीमा बंद, पर्यटकांना जिल्ह्यात येण्यास प्रतिबंध

सिंधुदुर्ग जिल्हय़ात आतापर्यंत  3459 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून त्यातील 151 व्यक्ती या परदेशी आहेत. तसेच पोलीस तपासणी नाक्मयांवर 324 व्यक्तींची तसापणी करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये एकही व्यक्ती कोरोनासदृश आढळलेली नाही. दरम्यान जिल्ह्यात अन्य जिल्ह्यातील आणि गोवा राज्यातून येणाऱ्या पर्यटकांवर बंदी घालण्यात आली आहे.  जिल्हय़ात 52 व्यक्ती निरीक्षणाखाली असून सद्यस्थितीमध्ये सातजणांना विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हय़ामध्ये सध्या मालवण येथे 10, सावंतवाडी – 10, वेंगुर्ले – 10, कणकवली – 10 आणि ओरोस आयटीआय येथे 64 बेड्सच्या क्वारंटाईनची सोय करण्यात आली आहे. तसेच गरज पडल्यास शाळांचाही त्यासाठी वापर करण्यात येणार आहे. तसेच आयसोलेशन वॉर्डसाठी जिल्हय़ात एकूण 106 बेड्सची व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय ओरोस येथे 50 बेड्स, सर्व उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथे एकूण 20 व खासगी रुग्णालयांमध्ये 36 बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here