सिंधुदुर्ग – सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभिषण चवरे यांची मुंबई येथे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, अखिल दशावतारी पारंपारिक लोककला अकादमी सिंधुदुर्गचे अध्यक्ष दिनेश गोरे, समीर तेंडुलकर यांनी आज भेट घेतली.कोरोनाच्या कालावधीसाठी कलाकारांना शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या ५ हजार रु.अनुदानासाठी स्वीकारलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी व भजनी कलाकारांचे प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करण्याची मागणी आ. वैभव नाईक यांनी केली. त्यावर श्री चवरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्रस्ताव मंजूर करण्याचे आदेश संबंधितांना दिले.
त्याचबरोबर कोविड पार्श्वभूमीवर दशावतारी कलाकारांच्या कंपनींना एक रक्कमी १ लाख रुपये रक्कम अनुदान तत्वावर दिली जाणार असून त्यासाठी जेवढे प्रस्ताव आलेत त्या सर्वांना मंजुरी देण्यासंदर्भात चर्चा झाली. वृद्ध कलाकारांचे मानधन २२५० रुपये वरून ५ हजार रुपये करण्याची मागणी आ. वैभव नाईक यांनी केली. त्याबाबत सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून मानधन वाढीसंदर्भात निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा दरवर्षी मुंबई येथे होणारा दशावतारी नाट्य महोत्सव यावर्षी कुडाळ मध्ये घेण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी केली. त्यावर देखील सकारात्मक चर्चा झाली. अशी माहिती आ.वैभव नाईक यांनी दिली आहे.