सिंधुदुर्ग – सागरी महामार्गाचा प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असून या मार्गात येणार्या 10 पुलांचा आयकॉनिक आराखडा तयार करण्याची मान्यता राज्यातील महाआघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
रेवस-रेडी सागरी महामार्गाच्या उभारणीबाबतची नुकतीच आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये राज्य शासनाने कोकण विभागातील रेवस-रेड्डी हा सागरी महामार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित यास कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्त केले आहे.
महामंडळामार्फत सदर सागरी महामार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा (DPR) तयार करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर असून या सागरी महामार्गाच्या आखणीमध्ये प्रामुख्याने रेवस ते करंजा पूल, रेवदंडा ते कोर्लई पूल, दिघी ते आगरदांडा पूल, बाणकोट खाडी पूल, साक्षी व केळशी पूल, दाभोळ ते वेलदूर पूल, साक्षी ते पाथर पूल, कुणकेश्वर पूल, वरवडे येथील पूल, कोलम खाडीवरील पूल या पूलांचा समावेश आहे.
कोकण सागरी महामार्ग कोकणासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा प्रकल्प समजला जातो. बॅ.ए.आर. अंतुले यांनी या महामार्गाचे स्वप्न पाहिले आणि बहुतांशी कामदेखील झाले आहेत. मात्र मार्गावरील काही पुलांचे काम बाकी राहिले आहे. या सरकारने पुन्हा या पुलांचा आराखडा तयार करण्यास सांगितल्यामुळे महामार्गाला चालना मिळणार आहे.



