सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील झाराप रेल्वे स्टेशन परिसरात कोकण रेल्वेच्या विद्युत दुरुस्ती गाडीच्या सामान ठेवण्याच्या कोचला आग लागली. या आगीत कोच पूर्णत: जळून खाक झाला आहे. हा प्रकार आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत रेल्वेचे अधिकारी गिरीश करंदीकर यांनी दुजोरा दिला आहे.
कोकण रेल्वे मार्गावर कुडाळ- झाराप दरम्यान तेर्सेबांबर्डे गेट जवळ ईलेक्टीक काम करणाऱ्या स्पेशल गाडीला बुधवारी सकाळी ९.३० ला आग लागली. तेर्सेबांबर्डे गेट जवळ ईलेक्टीकचे काम चालू असताना कोकण रेल्वेच्या काम करणाऱ्या कोचला अचानक आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी कुडाळ एमआयडीसी, सावंतवाडी आणि वेंगुर्ले येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. या लागलेल्या आगीत बोगीचे आणि दुरूस्ती साहित्याचे नुकसान झाले आहे. कोकण रेल्वेच्या मुख्य मार्गावर ही घटना घडल्याने राजधानीसह, जनशताब्दी, मांडवी या रेल्वे अडकून पडल्या होत्या. आग आटोक्यात आल्यानंतर मार्ग वाहतुकीला खुला करण्यात आला.



