कोकणात पावसाचे आतापर्यंत ६५ बळी, मदतीला लष्कर आणि एनडीआरएफ टीम दाखल

0
202

कोंकण – कोकणात गेले दोन दिवस पावसाने काही उसंत घेतलेली नाही. त्यामुळे अरबी समुद्राची हि पश्चिम किनारपट्टी जलमय झाली आहे. पावसाळा सुरु झाला आणि कोकणात पहिली घटना घडली ती रत्नागिरीतील तिवरे धरण फुटीची दुर्घटना. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांसह आतापर्यंत तिन्ही जिल्ह्यात पावसाचे ६५ बळी आहेत. त्यात रायगड मध्ये २६, सिंधुदुर्ग मध्ये ५, रत्नागिरी जिल्ह्यातील ३४ जणांचा समावेश आहे. यामध्ये तिवरे दुर्घटनेतील २५ जणही आहेत. दरम्यान रायगडमध्ये लष्कर तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एनडीआरएफ ला पाचारण करण्यात आले आहे.

यावर्षी जूनच्या उत्तरार्धात सुरु झालेल्या पावसाने कोकणात एकच हाहाकार माजवला. कोकणातील जनजीवन त्यामुळे प्रभावित झाले आहे. आज रायगड जिल्ह्यात पावसाने थोडी उसंत घेतली, परंतु सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यातली बरीच गावे पाण्याखाली गेली आहेत. चिपळूण, राजापूर येथे महामार्गावर पाणी आहे. तर सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा तिथवली नजीकचा सर्वात मोठा जामदा पूल पाण्याखाली आहे. परिणामी गेले काही दिवस मुंबई गोवा महामार्ग बंद आहे. महामार्गावर हजारो वाहने गेले ५ दिवस अडकून पडली आहेत. पश्चिम महाराष्ट्राला कोकणशी जोडणारा गगनबावडा घाटही ८ दिवस बंद आहे. तर बेळगावहून सिंधुदुर्गकडे आंबोली घाटातून होणारी अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा घाटही पुन्हा दरड कोसळल्याने बंद झाला आहे. बेळगावहून सिंधुदुर्गात येणार रामघाट मार्गही बंद आहे. आंबेनळी घाट मार्गही दरड कोसळली असल्याने बंद आहे.

सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तिलारी नदीला तब्बल २० वर्षानंतर महापूर आला. या नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून मणेरी , हेदूस , कुडासे , देवमळा , तिलारी , वांगनतड , कोनाळ सह १० गवे पाण्याखाली आहेत. तर २ घरे पूर्णतः जमीनदोस्त झाली आहेत. येथील नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफ पथक दाखल झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुरात सलग पाचव्या दिवशीही पूरस्थिती आहे. ओणी-तिसेवाडीत जमिन खचली त्यामुळे एक घर गाडले गेले आहे.

सध्या कोकणातील पूरस्थिती लक्षात घेता, रायगड जिल्ह्यात पेण येथे अडकलेल्या रहिवाशांना एनडीआरएफ च्या टीमने २ दिवस रेस्क्यू करून सुखरूप बाहेर काढले आहे. तब्बल १,५०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय लष्कराच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे. सिंधुदुर्गचे पूरस्थिती लक्षात घेता रायगड येथील एनडीआरएफ मदत पथकाला आज मंगळवार दिनांक ६ ऑगष्ट रोजी दुपारी १२ वाजता तिलारीच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे.

(सौजन्य : www.sahajshikshan.com )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here