कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आणि त्याच दरम्यान नाताळची सुट्टीचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक कोकणची वाट धरतात. त्यामुळे, पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर खास ख्रिसमससाठी जादा ५ साप्ताहिक गाड्या सोडणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर २३ ते ३० डिसेंबर या कालावधीसह ६ जानेवारी रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी ही साप्ताहिक गाडी दर सोमवारी दुपारी १ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल. लोकमान्य टिळक टर्मिनस कोचिवली विशेष गाडी २१ ते २८ डिसेंबरदरम्यान रात्री १२.४५ वाजता लो.टिळक टर्मिनस येथून सुटेल. तर, १८ ते २५ डिसेंबर दरम्यान लो.टिळक टर्मिनस करमाळी/थिविम ही साप्ताहिक गाडी दर बुधवारी रात्री १२.४५ ला लो.टिळक टर्मिनस येथून सुटेल. पनवेल करमाळी/थिविम ही साप्ताहिक गाडी १८ ते २५ डिसेंबर दरम्यान दर बुधवारी पनवेल येथून ११.५५ वाजता सुटेल. तर, यावेळी कोकण मार्गावर पुणे-एर्नाकुलम विशेष साप्ताहिक गाडी धावणार आहे. ही गाडी २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत दर सोमवारी धावेल. रात्री ७.५५ वाजता पुणे येथून ही गाडी सुटेल.