सिंधुदुर्ग – कुडाळ तालुक्यात ‘काळा बिबट्या’ सापडल्यानंतर आता जिल्ह्यात ‘वाघा’चे दर्शनही घडले आहे. सावंतवाडी वन विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये एका पाळीव जनावराची केलेली शिकार खाताना वाघाचे छायाचित्र टिपले गेले आहे.
जिल्ह्यात नुकताच कुडाळ तालुक्यात दुर्मिळ प्रजातीतील ‘काळा बिबट्या’ दिसून आला आहे. त्यानंतर आता जिल्ह्यातील जंगल क्षेत्रामध्ये ‘वाघा’चा वावर असल्याचे दिसून आले आहे.
त्यामुळे जिल्हा जैवविविधतेने संपन्न असल्याचे दिसून येते. वाघ हा प्राणी परिसंस्थेच्या सर्वोच्च स्थानावरील वन्य प्राणी असून तो परीपूर्ण जंगलाचे प्रतिक म्हणूनही पाहिला जातो.
जिल्ह्यातील या वैनवैभवाचे संरक्षण व संवर्धन होण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्या पाळीव प्राण्यांची वन्यप्राण्यांकडून शिकार झाल्यास तातडीने वन विभागाशी संपर्क साधावा. जेणे करुन आपण शासनामार्फत नमुद केल्याप्रमाणे नुकसान भरपाई देता येईल.
तसेच आपला हा समृद्ध वन वारसा जोपाण्यासाठी सावंतवाडी वन विभागासह आपण सर्व नागरिकही कटिबद्ध राहुया, असे आवाहन एस.डी.नारनवर, उपवनसंरक्षक सावंतवाडी वन विभाग यांनी केले आहे.